नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. अशातच लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी तामिळनाडूतील नीलगिरीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ‘ज्या कुणालाही दारु विकत घ्यायची असेल त्याने आधी लसीकरण प्रमाणपत्र दाखवावे त्यानंतर त्याला दारू मिळेल’ असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. दारूचे सेवन करणारे लोक लसीकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी देशात मोफत लसीकरण मोहिम हाती घेतले आहे. त्यातही जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी यासाठी सरकार अनेक अभियान चालवत आहेत. त्यातूनच कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना अनेक निर्बंधातून सूट मिळताना दिसत आहे. मुंबईतही ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
आता कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच दारु विकत घेण्याचा नियम सरकारने आखला आहे. तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी हा नियम लागू केला आहे. लोकांनी लसीकरण मोहिमेत उत्साहाने भाग घ्यावा असा तर्क स्थानिक जिल्हाधिकारी दिव्या यांनी लढवला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दोन डोस घेतलेल्यांनाच दारु मिळणार आहे. हासुद्धा लसीकरण अभियानाचा भाग असल्याचं त्यांनी सांगितले. याचा अर्थ असा की, नीलगिरीतील तळीरामांना दारु हवी असेल तर त्यांना आधी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले प्रमाणपत्र दाखवावं लागणार आहे.
जिल्हाधिकारी दिव्या म्हणाल्या की, जिल्ह्यात जवळपास ९७ टक्के लोकसंख्येने कोरोना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणावरुन जिल्ह्यात अनेक अफवा आणि चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. त्यामुळे लसीकरणाबाबत जागरुकता आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लसीकरण अभियान सुरु केले आहे. जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करावं असं लोकांना आवाहन करण्यात येत आहे. तरीही लोक लस घेण्यापासून दूर जात असल्याचं त्यांनी सांगितले.
काही लोकांनी आम्ही दारुचं व्यसन करतो त्यामुळे लस घेण्यात तयार नाही असं म्हटलंय. अशा लोकांनी लसीकरणासाठी पुढे यावे यासाठीच हा निर्णय घेतला आहे. ज्या कुणालाही दारु विकत घ्यायची असेल तर आधी लसीकरण प्रमाणपत्र दाखवा आणि दारु घ्या असा आदेश देण्यात आला आहे. सरकारी दारु विक्री दुकानावर लसीकरण प्रमाणपत्रासह आधारकार्डही जमा करण्याची गरज आहे. तामिळनाडूतील नीलगिरी हे नैसर्गिक पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. लॉकडाऊनमुळे याठिकाणच्या पर्यटनावर परिणाम झाला. परंतु आता हळूहळू प्रशासन पर्यटन खुले करत आहे.