पुणे : आम आदमी पक्षाने पुणे महानगरपालिकेबाबत मोठी घोषणा केली आहे. आप पुणे मनपा निवडणुकीत सर्व जागा लढवणार आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह आता आपही निवडणूक रिंगणात दिसणार आहे. त्यामुळे पुण्यातील निवडणुकीची आणखीच वाढणार आहे. आपच्या राज्य समितीने पुण्यात पत्रकार परिषद घेत पुण्यातील कॅन्टोन्मेंटसह मनपाच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली.
आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे म्हणाले, “आप हा स्वच्छ प्रतिमेचा पक्ष आहे. महाराष्ट्रातील आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. अश्या स्थितीत आप सारखा राजकीय पर्यायच ही परिस्थिती सुधारू शकतो.” “दिल्लीतील विकास कामे आणि प्रस्थापित राजकीय पक्षांकडून होत असलेली जनतेची फसवणूक यामुळे आप हा पर्याय जनता स्वीकारेल,” असं मत आपचे सह संयोजक किशोर मंध्यान यांनी व्यक्त केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आपचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे म्हणाले, “गेले काही दिवस आप राज्यसमिती विविध शहरांना भेटी देत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. शहरी तोंडावळा असूनही आम्हाला ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. आता पुण्यासारख्या शहरात चांगला प्रतिसाद जनतेकडून मिळेल.”
पुण्यात महसूल विभागापाठोपाठ महानगरपालिकेत लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने टक्केवारी आणि भ्रष्टाचारबाबत नवा टप्पा गाठला आहे. या ‘भाजप राष्ट्रवादी भाऊ भाऊ , सर्व वाटून खाऊ’ या धोरणाचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे आता आपची ही निवडणूक पुणेकर जनताच लढवेल, असा आशावाद व्यक्त केला.
पत्रकार परिषदेस पुणे शहर अध्यक्ष मुकुंद किर्दत , संघटन मंत्री डॉ. अभिजित मोरे, सह संयोजक संदीप सोनावणे, संदेश दिवेकर, विद्यानंद नायक यांची उपस्थिती होती.