मुंबई : केलेला समझोता पाळायचा की पाठीत पुन्हा धारदार खंजीर खुपसायचे हे राष्ट्रवादीने ठरवायचे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन असा इशाराही त्यांनी दिला. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो, असे ते म्हणाले. दरम्यान, आता शरद पवार हे शेट्टींबाबत काय निर्णय घेतात, याची सर्वत्र चर्चा आहे.
राजू शेट्टी हे कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “एकतर सध्या मी या पूरग्रस्तांच्या आंदोलनामध्ये आहे. स्वाभिमानी संघटनेसाठी किंवा पक्षासाठी विधानपरिषद हे काही आमचं साध्य नाही किंवा ते नाही मिळालं तर आम्ही किंवा आमच्यातील काही दहा-वीस लोक आत्महत्या करतील असं काही नाही. एक समझोता झाला होता. महाराष्ट्राच्या विधानसभेत जी आमदाराची संख्या आहे त्यावरून, जी निवडली जाणारी विधानपरिषद आहे ती किंवा सत्ता आली तर राज्यपालांच्या कोट्यातून सरकारला जे काही १२ आमदार नेमता येतात, त्यातली एक जागा स्वाभिमानी पक्षाला द्यायचं, असं शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी कबूल केलेलं होतं.”जो समझोता झाला होता त्यानुसार एक विधानपरिषद स्वाभिमानीला मिळणार आहे एवढच. मग त्यासाठी एवढी चर्चा आणि आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणून, असं काय कोण आमच्यावर मेहरबानी करत नाही किंवा कुणी आमच्यावर दया करत नाही आणि आम्हाला अशा दयेची गरजही नाही.” असं देखील राजू शेट्टींनी यावेळी बोलून दाखवलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राजू शेट्टी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. या पराभवाने खचून न जाता शेट्टी यांनी शेतकऱ्यांची आंदोलने सुरूच ठेवली. मधल्या काळात त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर घेण्याचं ठरलं. मात्र, सहा महिने झाले तरी राज्यपालांनी विधानपरिषदेच्या सदस्यांची यादी मंजूर केली नाही. त्यामुळे नियुक्त्या रखडल्या. मात्र, या कालावधीत विधान परिषदेवर जाण्याची वाट न पाहता शेट्टी यांनी आपली आंदोलने सुरूच ठेवली. शेतकऱ्यांच्या हमीभावापासून ते पूरग्रस्तांना न्याय मिळून देण्यापर्यंत त्यांनी आंदोलन करत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ढवळून काढला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने त्यांचा पत्ता कापला असावा, असे बोलले जात आहे.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “आम्ही पहिली 12 नावं मंत्रिमंडळाने दिली. असं बोललं जाते की नजिकच्या निवडणुकीत एखादी व्यक्ती पराभूत झाली असेल तर त्याला नेमलं जात नाही अशी नवी माहिती पुढे आली आहे. यात तथ्य आहे का याची शहानिशा आम्ही करतोय. जर का अडचण आली तर मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील. मात्र अरुण जेटलींचा पराभव झाल्यानंतर त्यांना नरेंद्र मोदींनी राज्यसभेवर घेतलं होतं” असं अजित पवार म्हणाले. राजू शेट्टी हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांना आता विधानपरिषदेवर घेता येतं की नाही, याबाबतचा नियम आता महाविकास आघाडीकडून तपासला जात असल्याचे सांगितले.