पुणे : राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीतून राजू शेट्टी यांचे नाव वगळल्याची चर्चा राज्यभरात सुरु आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. राज्यपालांना दिलेल्या यादीत कोणताही बदल करण्यात आला नसून राजू शेट्टींचे नाव वगळण्यात आले नाही, असं शरद पवारांनी सांगितलं. आम्ही आमचा दिलेला शब्द प्रामाणिकपणे पाळला आहे, असंही पवार म्हणाले.
राजू शेट्टींना दिलेला शब्द आम्ही पाळलाय, आता यावर त्यांनी काय विचार व्यक्त केलेत यावर मी बोलणार नाही; असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वृत्त फेटाळून लावले आहे. पुण्यात शरद पवारांच्या हस्ते कर्वेनगरमधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूलच्या कोनशिलेचं अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
राजू शेट्टी यांचं सहकार आणि कृषीक्षेत्रातलं योगदान लक्षात घेऊनच आम्ही त्यांचं नाव राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत दिले होते. पण पुढे काय झालं माहित नाही. राज्यपालांकडे तो विषय प्रलंबित आहे. आम्ही तरी त्यांचं नाव यादीतून वगळलेलं नाही; असं स्पष्ट खुलासा शरद पवार यांनी केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. इतके दिवस दिल्लीत शेतकरी बसले आहेत, त्यांची दखल केंद्र सरकारने घ्यायला हवी होती. पण दुर्दैव आहे. अनेक राज्यात असं होत आहे पण अन्य राज्यात ही हा विषय आहे; अशी नाराजीही पवारांनी व्यक्त केली.
मंदिर उघडण्याची भाजप मागणी करत आहे. पण विरोधकांनी याबाबत तारतम्य बाळगण्याची आवश्यकता आहे. कोविडबद्दल केंद्र सरकारने राज्य सरकारला काही नियमावली दिली आहे. आणखी काही दिवस खबरदारी घ्यायची गरज आहे असा निर्देश आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ती काळजी घेत आहेत, अन्य घटक काही दुसरे मत असेल तर लोकशाही आहे. केंद्र सरकारच्या विचारांची लोक आहेत त्यांनी तारतम्य ठेवण्याची गरज आहे, असा टोलाही शरद पवारांनी विरोधकांना लगावला.
* करेक्ट कार्यक्रम करणार; राजू शेट्टींचा इशारा
केलेला समझोता पाळायचा की पाठीत पुन्हा धारदार खंजीर खुपसायचे हे राष्ट्रवादीने ठरवायचे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन असा इशाराही त्यांनी दिला. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो, असे ते म्हणाले. दरम्यान, आता शरद पवार हे शेट्टींबाबत काय निर्णय घेतात, याची सर्वत्र चर्चा आहे.