बार्शी : वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश विश्वास गुरुपाद गोदेपुरे यांच्या अपघाती मृत्यूबद्दल जबाबदार ठरवून वाहनमालक शेख नूरसाब अब्दुलसाब मिर्झा पटेल (रा. निलंगा जि. लातूर) यांनी वैयक्तिकरित्या वारसांना एकूण 1,15,58,456 रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश बार्शी मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने दिला आहे.
अपघातावेळी विमा अस्तित्वात नसल्यामुळे न्यायाधिकरणाने युनायटेड इंडिया विमा कंपनीला भरपाई च्या जबाबदारीतून मुक्त केले. या प्रकरणात वाहनमालकाने संगनमताने मागील तारखेचा विमा उतरवण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आल्यामुळे सीबीआयने विमा कंपनीच्या कर्मचार्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोदेपुरे यांच्या वतीने ऍड. डी.डी. देशमुख यांनी तर विमा कंपनीच्यावतीने ऍड .व्ही. एन. देशपांडे यांनी काम पाहिले.
मूळचे बार्शी येथील असलेले विश्वास गोदेपुरे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे कर्तव्यास होते. 31 मार्च 2014 रोजी सुट्टीनिमित्ताने ते आपल्या सहकारी न्यायधीशांसमवेत सहकुटुंब धार्मिक क्षेत्राच्या भेटीसाठी गुलबर्गा येथे निघाले होते. नूरसाब पटेल यांचा मुलगा वकील असल्यामुळे ओळखीतून त्याने आपली स्कार्पिओ जीप प्रवासासाठी विनाभाडे दिली होती. चालकाने भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालविल्यामुळे उमरगापासून काही अंतरावर ही जीप उलटली आणि विश्वास गोदेपुरे यांचा गंभीर जखमी होवून जागीच मृत्यू झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा आधार हिरावल्याने वारसदार पत्नी, मुले आणि आईने एकत्रितरित्या नूरसाब पटेल आणि युनायटेड विमा कंपनीविरोधात दावा दाखल केला. दाव्याच्या चौकशीत विमा कंपनीने नूरसाब पटेल यांनी लातूर येथील कंपनीच्या तत्कालीन विकास अधिकार्याशी संगनमत करुन लबाडीने विमा केला आहे. दुसर्याने भरलेल्या विमा हप्त्याची रक्कम आपली आहे, असे दर्शविले आहे. हे उघडकीस आल्यानंतर कंपनीने चौकशी सुरु केली आहे.
अपघातग्रस्त वाहनाचा विमा कंपनीने उतरविलेला नव्हता, पटेल यांनी विमा हप्ता भरलेला नाही. सीबीआयने कंपनीचे कर्मचारी आणि पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पटेल यांनी ज्या इंडा मोबाईल सेल्स आणि सर्व्हिस एजन्सीकडून विमा उतरविला आहे, असा दावा केला आहे. त्या एजन्सीकडे थर्ड पार्टी विमा उतरविला जात नव्हता. अपघातानंतर लबाडीने मागील तारखेत विमा करण्याचा प्रयत्न झाला, जीपला प्रवासी वाहतूकीचे परमिट नव्हते. कंपनीवर भरपाईची जबाबदारी येत नाही, असे प्रतिपादन केले. याबाबत साक्षीदारांच्या चौकशीनंतर विमापावती खोटी असून कंपनीने वाहनाचा विमा उतरविला नसल्याचा निष्कर्ष निघाला.
अपघात समयी गोदेपुरे 49 वर्षाचे होते. त्यांना भविष्यात मिळणारे पगाराचे उत्पन्न, भविष्यातील प्रगतीविषयक 30 टक्के समाविष्ट करुन त्यांचे वार्षिक उत्पन्न 8,84,112 रुपये निश्चित केले. त्याच्या तेरा पट रक्कम आणि कन्सारटियम लॉस व अंत्यसंस्कार व्याजासह निश्चित केलेली भरपाईची एकूण रक्कम 1,15,58,456 रुपये चार वारसदारांमध्ये विभागून दावा तारखेपासून 9 टक्के व्याजदाराने दोन महिन्यात देण्याचा आदेश न्यायाधिकरणाने दिला.