बार्शी : दारु पिवून शिवीगाळ, आरडाओरडा करण्यास मज्जाव केल्यामुळे मद्यपीने पोलिस पाटील आणि त्यांच्या सहकार्याला चाकूने भोसकल्याची घटना तालुक्यातील धोत्रे येथे घडली आहे. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या पोलिस पाटलांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे.
याप्रकरणी जखमी सहकारी प्रविण रामचंद्र सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हल्लेखोर सुनील उर्फ सोन्या अंकुश गुरव याच्याविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला असून तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. शिवाजी जायपत्रे यांनी आरोपीस लागलीच अटक केली आहे.
आरोपी सुनील गुरव हा गावात दारु पिवून आरडाओरडा करत फिरत होता. त्यामुळे पोलिस पाटील शाहीर दत्तात्रय जाधवर हे मयूर लांडे व प्रविण सोनवणे यांच्यासह त्याच्या वस्तीवर गेले व त्यास तू शिवीगाळ, आरडाओरडा करु नकोस अन्यथा मी पेालिस ठाण्यास फोन करतो, असा दम दिला. त्यामुळे त्याने पाटील यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. पाटील यांनी त्यास उलट धक्का दिला असता तो खाली पडला.
त्यानंतर त्याने उठून आपल्याजवळील चाकू काढून बेसावध असलेल्या प्रविण सोनवणे याच्या मांडीला अगोदर भोसकले. त्यामुळे ते खाली पडले असता त्याने जाधवर यांच्याही छातीवर व पोटावर भोसकले. त्यामुळे गंभीर जखमी होवून ते खाली पडले. त्यांना इतरांनी उचलून जवळील वस्तीवरील खोलीत नेले व खोलीला आतून कडी लावून बसले असता तेथेही गुरव पाठलाग करत आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शिवीगाळ करत आता तुम्हांला जिवंत सोडणार नाही, असे म्हणू लागला. थोड्या वेळाने तो निघून गेल्यानंतर त्यांना उपचारासाठी बार्शी येथे नेण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना सोलापूरला हलविण्यात आले.
* मध्यरात्री संशयास्पदरित्या दबा धरुन बसलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
बार्शी : शहराच्या मध्यवर्ती भागात मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पदरित्या दबा धरुन बसलेल्या दोन तरुणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात पोलिस अंमलदार फिरोज मुन्नुमिया बारगीर व ज्ञानेश्वर प्रभुलिंग घोंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स.पो.नि. ज्ञानेश्वर उदार, सपोफौ. अजित वरपे, पोलिस अंमलदार माळी, ठेंगल, घोंगडे यांचे पथक बार्शी शहरात रात्र गस्त घालत शिवाजी आखाडा येथे पोहचले असता तिथे साक्षी बिअर शॉपी लगत भिंतीच्या आडोशाला दोघे जण अंधारात दबा धरून बसलेले दिसले.
पोलिसांना पाहून ते तिथून पळुन जावू लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. त्यावेळी रात्रीचे सव्वा एक वाजले होते. त्यांना ताब्यात घेवुन नाव, पत्ता विचारला असता प्रारंभी ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. नंतर त्यांनी त्यांची नावे यशराज राजेश देशपांडे (रा. पाटील प्लॉट, बार्शी), श्रीकांत बाळासाहेब सुरवसे (रा. चैत्यन्य नगर उपळाई रस्ता, बार्शी) असे नाव असल्याचे सांगीतले. त्यांना तेथे येण्याचे कारण विचारले असता समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यावरुन ते चोरीसारखा अपराध करण्याच्या उददेशाने थांबले असावेत म्हणुन त्यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. त्यांच्या विरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.