मोहोळ : मोहोळ शहरातील नगर परिषदेच्या मालकीच्या मेनरोडवरील पथदिवे जेसीबीच्या साह्याने पाडणार्या आरोपींचा तब्बल पाच महिन्यांनी मोहोळ पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणात राष्ट्रवादीच्या रोहित उर्फ अण्णा अनिल फडतरे, संतोष जनार्दन सुरवसे, आकाश उर्फ गोटू नामदेव बरकडे, संदीप उर्फ रमेश सरगम सरवदे, अमर राजेंद्र कसबेकर, माजी नगरसेवक रुपेश हिरालाल धोत्रे व क्रेन मालक लखन नागनाथ साळुंके (सर्व रा. मोहोळ) अशी संशयित आरोपी म्हणून सातजणांची नावे निष्पन्न झाली आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ नगरपरिषदेने मेनरोडवरती ठीक ठिकाणी पथदिवे लावलेले आहेत. १ मार्च २०२१ रोजी नगरपरिषद कार्यालयासमोरील मेन रोडवरील एकूण ४ पथदिवे अज्ञात इसमांनी पाडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले होते. या प्रकरणी नगरपरिषदेचे कनिष्ठ विद्युत अभियंता राजकुमार सपाटे यांनी मोहोळ पोलिसात १ एप्रिल २०२१ रोजी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून मोहोळ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता.
दरम्यान सदरचे पथदिवे लखन नागनाथ साळुंखे याच्या क्रेनच्या साह्याने पाडले गेले असल्याची गोपनीय माहिती ८ सप्टेंबर रोजी मोहोळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपासी अंमलदार विजय माने यांनी लखन साळुंके यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले क्रेन जप्त केले. यावेळी सदरचे कृत्य त्याने अण्णा फडतरे, संतोष सुरवसे, आकाश उर्फ गोटू बरकडे, संदीप उर्फ रमेश सरवदे, अमर कसबेकर, रुपेश धोत्रे यांच्या सांगण्यावरून केल्याचे पोलिसांना सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या गुन्ह्याच्या अनुषंगाने संशयित आरोपी म्हणून या लोकांचा समावेश करण्यात आला आहे. तब्बल पाच महिन्यानंतर मोहोळ पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींचा छडा लावला आहे. याबाबत मोहोळ पोलीसात विद्रुपी करणाबाबतचा गुन्हा मोहोळ पोलीसात दाखल असुन अधिक तपास सहायक फौजदार विजय माने करित आहेत.
नगर परिषदेच्या मालकीचे सार्वजनिक पथदिवे जेसीबीच्या सहाय्याने पाडुन शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी १ एप्रिल २०२१ रोजी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात निष्पण झालेल्या सशंयित सातआरोपीपैकी चार आरोपी हे १४ जुलै २०२१ रोजी शहरातील शिवसैनिक सतीश क्षिरसागर व विजय सरवदे या दोघांच्या खुन प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत.
* तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
सालापूर : घरात झालेल्या किरकोळ तक्रारीवरून एका २२ वर्षीय तरुणाने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तोगराळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील भुयारे यांच्या शेतात गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
चंद्रकांत महादेव भुयारे (वय 22) असे मयताचे नाव आहे. तोगराळी येथील शेतात असलेल्या लक्ष्मी मंदिर जवळील लिंबाच्या झाडाला त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या पट्टीने गळफास घेतलेल्या अवस्थेत गुरुवारी सकाळी आढळून आला. मयत चंद्रकांत भुयारे हा छोटा हत्ती या वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. त्याच्या पश्चात आई वडील एक भाऊ, आणि दोन बहिणी असा परिवार आहे. नवीन वाहन घेण्याच्या कारणावरून घरात तक्रार झाली होती. त्यातून हा प्रकार घडला असावा. याची नोंद वळसांग पोलिसात झाली. सहाय्यक फौजदार सुरवसे पुढील तपास करीत आहेत .