गांधीनगर : गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील यांचे नाव चर्चेत आहेत. मुळचे मराठी असलेले चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)हे भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष आहेत. ते विकासकामे करण्यासाठी ओळखले जातात. पाटील यांचा जन्म १९५५ साली महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यात झाला. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात कंपनीत कामगार म्हणून केली. १९८९ सालापासून त्यांनी भाजपमध्ये कार्यकर्ता म्हणून राजकारणाची सुरुवात केली.
चंद्रकांत पाटील उर्फ सीआर यांनी आपलं प्राथमिक शिक्षण दक्षिण गुजरातमधून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी सुरत इथल्या आयटीआय अर्थात इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेतून सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला.
विजय रुपानी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी गुजरात भाजपा विधिमंडळ पक्षाची रविवारी बैठक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह केंद्रीय निरीक्षकांसह विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात, असे भाजपाचे राज्य प्रवक्ते यमल व्यास यांनी सांगितले. तसेच, काही केंद्रीय मंत्री गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचेही सांगितले जाते.
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी असताना अशा वेळी सत्ताबदलाबाबत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठीच हे डावपेच आखले जात आहेत. विजय रुपानी यांच्या नेतृत्वाबद्दल गुजरातमधील पटेल समाजात नाराजी होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपाला विजय मिळणे कठीण होते, हे स्पष्ट दिसल्यानेच भाजप नेतृत्वाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
विजय रुपाणी यांनी राजीनामा देण्याच्या एक महिना आधी रुपाणी सरकारने महोत्सव साजरा केला होता. त्यानंतर एका महिन्यातच रुपाणींची उचलबांगडी केल्यामुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे नेते परेश धानानी यांनी यावर चांगलीच टीका केली आहे. जर महिनाभरापूर्वीच रुपाणी सरकारच्या यशाचा महोत्सव साजरा केला तर मग आता चेहरा बदलण्याचा घाट घालणे म्हणजे स्वतः चे अपयश झापण्यासाठी ही उठाठेव केल्याचाही आरोप केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गुजरातच्या पुढील मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत मनसुख मंडाविया यांच्यासह केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन मंत्री पुरुषोत्तम रुपाला, चंद्रकांत पाटील यांचं नाव चर्चेत आहे. मनसुख मंडाविया यांना जुलै महिन्याच्या मोदी कॅबिनेट विस्तारात स्थान देऊन डॉ. हर्षवर्धन यांच्याजागी आरोग्य मंत्रालयाची धुरा सांभाळायला दिली. तर गोरधन जदाफिया यांच्याही नावाची चर्चा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे आहे.
चंद्रकांत पाटील हे प्रभावशाली खासदार म्हणून ओळखले जातात. त्याच्या मतदारसंघातील विकास कामांना प्रमोट करण्याबाबत ते माहीर आहेत. गुजरात भाजपाने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी २८१ सदस्यांची जम्बो कार्यकारणी बनवली त्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू शिलेदार म्हणून चंद्रकांत पाटलांची ओळख आहे. नवा मुख्यमंत्री ठरवण्यात चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून भूमिका महत्त्वाची असेल. चंद्रकांत रघुनाथ पाटील हे नवसारीचे खासदार आहेत. भाजप वर्तुळात ते सीआर पाटील म्हणून तर निकटवर्तीयांमध्ये CR म्हणून प्रसिद्ध आहेत.
सुरत भाजपचे खजिनदार म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. मात्र, निवडणुकांच्या राजकारणात येण्यासाठी त्यांना दोन दशके वेटींगमध्ये राहावे लागले. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये त्यांचे काम चांगले दिसून आले. त्यावेळी त्यांनी पुढाकार घेऊन या भागातील स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात म्हणजेच ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार इथे परत पाठवलं. सुरतच्या विमानतळाचा प्रश्न अनेक वर्ष रेंगाळत पडला होता. सीआर पाटील यांनी तो प्रश्न जाणून लवकर मार्गी लावला. कंपन्यांचे मालक ते कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार असा सीआर पाटील यांचा दांडगा संपर्क आहे. सीआर पाटील स्वत: शेतकरी आणि उद्योगपती आहेत. मीडिया उद्योगसमूहातही त्यांचा चांगले संबंध आणि वावर असल्याचे सांगितले जात आहे.