बार्शी : बार्शी तालुक्यात पावसाने सप्टेंबरच्या मध्यातच वार्षिक सरासरी ओलांडली असून गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसात दररोज पडत असलेल्या पावसामुळे तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी अशी परिस्थिती झालेली आहे. प्रमाणापेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्वत्र पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी होत आहे.
बार्शीकडे येणार्या अनेक मार्गांवर असलेले पुल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही अतिउत्साही नागरिकांनी पुलावरुन धोकादायकरित्या पाणी वाहत असतानाही पुल ओलांडण्याचा अट्टाहास होण्यामुळे त्यांची वाहने वाहून जाण्याच्याही घटना घडल्या आहेत. तालुक्यातील मांडेगाव येथे पुलावरुन वाहणार्या पाण्यात स्टंटबाजी केल्यामुळे एक तरुण वाहून गेला आहे. पावसामुळे निर्माण होणार्या परिस्थितीवर महसूल विभाग बारकाईने लक्ष ठेवून असून आपत्तकालीन कक्ष चोवीस तास कार्यरत आहे.
बार्शी तालुक्यात मंडळनिहाय पर्जन्यमान नोंदविण्याची व्यवस्था सजग आहे. त्यामुळे अद्यावत माहिती प्राप्त होत आहे. तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी 501.1 आहे. हा आकडा ओलांडून 26 सप्टेंबर पर्यंत सरासरी 637.6 मि.मि. पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा हा पाऊस 26.2 टक्के जास्त आहे. तालुक्यात सर्वाधिक पाऊस पानगाव मंडळामध्ये 885.8 मि.मि. तर सर्वात कमी सुर्डी मंडळामध्ये 449.1पडला आहे. बार्शी 749.1, पांगरी 573.3, गौडगाव 569.5, वैराग 680.0, खांडवी 482.8, उपळे दुमाला 541.6, आगळगाव 757.3 असा पाऊस पडला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तालुक्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला आहे. काही प्रकल्प पुर्ण भरले आहेत तर काही भरण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागांना आणि शेजारच्या जिल्ह्यांना जोडणार्या बहुतांश रस्त्यावर अत्यंत कमी उंचीचे पुल आहेत. त्यामुळे या पुलावरुन वारंवार पाणी वाहत आहे. पुलावर पाणी वाढले की, वहातूक बंद पडत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या पुलांची उंची वाढविण्याची मागणी होत आहे.
मात्र त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना गैरसोय सोसावी लागत आहे. काही काळ ग्रामीण भागातील गावांचा परिसरातील इतर गावांशी, बार्शीशी संपर्क तुटत आहे. या परिस्थितीमुळे अद्यापपर्यंत जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नसले तरी अनेकांचे आर्थिक नुकसान मात्र मोठे झाले आहे.
* बक्षीहिप्परगे ते दहिटणे मार्गावरच्या ओढ्यात वाहून दोन बैलांचा मृत्यू
दक्षिण सोलापूर : बक्षीहिप्परगे ते दहिटणे मार्ग या ठिकाणी ओढ्याच्या पाण्यामध्ये बाबासाहेब माने यांच्या दोन बैलाचा वाहुन जावुन जागीच मृत्यू झाला. बैलगाडी वाहक कसेबसे आपले जीव वाचवण्यात यश आले. या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना करण्यात आली.
गेल्या वर्षी याच ओढ्यामध्ये एक महीबुब नामक व्यक्तीचा वाहुन मृत्यू झाला होता. अशा घटना वारंवार होत असून गावकऱ्यांच्यावतीने सतत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या ओढ्याच्या उंची वाढविण्याबाबत निवेदने देण्यात आली, अजूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा घटना वांरवार होत आहे. तरी सर्व घटनांचा गांभीर्याने विचार व्हावा व ओढ्याची उंची वाढवी, अशी मागणी समस्त ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.
अशा सर्व घटना फक्त ओढ्याच्या पुलाची उंची कमी असल्या कारणास्तव झाल्या आहेत. गावकऱ्यांना हा त्रास सतत होत असल्याने त्यांनी या समस्यावरती संताप व्यक्त करत पुलाची उंची नाही वाढल्यास जिल्हा परिषद या ठिकाणी उठाव करू, असा इशारा दिला. या वेळी उपसरपंच मनोज महाडिक, विश्रांत गायकवाड, बाबासाहेब माने , माजी भाजपा अल्पसंख्याक शहर सोलापूर उपाध्यक्ष गौसपाक पठाण, अमोल जाधव, विनोद महाडिक यांनी हा इशारा दिला आहे.