बार्शी : बायकोला नांदण्यास का पाठवित नाही, असे म्हणत नवरा मेहुण्याला चावल्याची घटना तालुक्यातील राळेरास येथे घडली आहे. याबाबत जखमी दिपक बब्रुवान पंके याने दिलेल्या फिर्यादीवरुन त्याच्या बहिणीचा नवरा बालाजी विलास माने (रा. तडवळे ता. बार्शी) याच्याविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीची बहिण साधना बब्रुवान पंके हिचे गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात बालाजी माने याचे सोबत लग्न झाले आहे. बालाजी हा लग्न झाल्यापासून साधना हिस त्रास देत असल्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून ती आपल्या माहेरी राळेरास येथे राहत आहे. दिपक हा नेहमीप्रमाणे शेळ्या घेवुन शेतात गेला असता दुपारी चारच्या सुमारास बालाजी याने त्यास फोन करुन तुझ्या बहिणीला नांदायला पाठव, नाहितर सोडचिठ्ठी दे असे म्हणुन शिवीगाळी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर सायंकाळी 6.30 वा. चे सुमारास तो शेतात असतानाच त्यास बहिण साधना हिने फोन करुन नवरा बालाजी हा घरी येवुन शिवीगाळी करत आहे, असे सांगितले. त्यामुळे तो घरी गेला असता बालाजी हा घराबाहेर थांबुन आरडाओरड करत असलेला दिसला. त्यामुळे त्याने आरडाओरडा, शिवीगाळी करू नको, सोडचिठ्ठी बाबत पाठविलेल्या नोटीस चे कोर्टमध्ये उत्तर देतो, साधना तुझ्यासोबत नांदण्यास येण्यास तयार नाही, त्यामुळे तिला पाठवणार नाही, असे म्हटले असता बालाजी याने त्यास लाथाबुक्यांनी मारहाण करुन डाव्या हाताला चावा घेतला. तसेच बाजुलाच खाली पडलेली फरशी घेवुन त्याने त्याच्या हातावर हाणली, त्यामुळे मार लागून तो जखमी झाला. यावेळी शेजार्यांनी येवून त्याची सुटका केली.
* शासकीय रुग्णालयात पाय घसरुन पडल्याने मृत्यू
सोलापूर : वडिलांना उपचारासाठी ॲडमिट केल्यानंतर पायी जात असताना चक्कर येऊन पडल्याने तरुण जागीच मयत झाला. ही घटना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या आवारात मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली.
शाम अप्पाराव कोळेकर (वय २६ रा. तुंगत ता. पंढरपूर) असे मयताचे नाव आहे. तो सोमवारी रात्रीच्या सुमारास त्याचे वडील आप्पाराव कोळेकर यांना शासकीय रुग्णालयातील ए ब्लॉक येथे उपचारासाठी दाखल केला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी तो पायी रुग्णालयातील ओपीडी येथे जात होता. त्यावेळी चक्कर येऊन खाली पडल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला त्याच राणालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वी मयत झाला.
शाम कोळेकर हा विवाहित असून त्याच्या पश्चात आई, वडील एक भाऊ, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. तो शेतीचा व्यवसाय करीत होता.या घटनेची नोंद सदरबाजार पोलिसात झाली आहे .