पंढरपूर : सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यातच परिवर्तन मोहिमेची खूपच चर्चा होत आहे. ही मोहीम यशस्वी होत आहे. यातून एक दारु विक्रेता रिक्षाचालक बनला आहे. हे या मोहिमेचे फलितच म्हणावे लागेल.
अवैध धंदा करून कुटुंबाची उपजीविका भागवणाऱ्या व्यक्तींची शोध मोहीम घेऊन त्या व्यक्तींना अवैध धंद्यापासून परावृत्त करण्याची मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी राबवली आहे. या मोहिमेला जिल्ह्यातील अवैद्य धंदे चालक प्रतिसाद देत असून पंढरपूर शहरातील संत पेठ भागात अवैध दारू विक्रेता तरुणाने पोलिसांच्या मोहिमेला प्रतिसाद देऊन रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याच्या या निर्णयाचे पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी स्वागत करून सर्वात प्रथम प्रवासी म्हणून त्याच्या रिक्षात बसत शहरातून फेरफटका मारला.
जिल्ह्यातील अवैध धंदेचालकांवर कायदेशीर कारवाई केल्या तरी देखील सबंधित व्यक्ती अवैध धंदे हे चोरुन चालूच ठेवतात. यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी परिवर्तन मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत अवैध धंदे चालकांचे मन परिवर्तन करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पोलीस करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंढरपूर शहरातील तरुण अवैध दारु विकण्याचे काम करीत होता. उपविभागीय पोलीस अधिकारी व शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी संबधित तरुणाचे मनपरिवर्तन केले. यानंतर या तरुणाने दारु धंदा बंद करीत रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. यातून तो आपला संसार चालवत आहे.
त्या तरुणाने रिक्षा घेतल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी या तरुणाचा सत्कार केला. याचबरोबर शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्यासोबत रिक्षात प्रवास करुन तरुणाच्या रिक्षा व्यवसायास शुभेच्छा दिल्या. प्रथम प्रवासी म्हणून चक्क पोलीस अधिकारी बसल्याने संबधित तरुण देखील भारावून गेला होता.
* तारापुरात अचानक राहते घर खचले
पंढरपूर : पंढरपूर परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील घरांची पडझड होऊ लागली आहे. तारापूर (ता. पंढरपूर ) येथील मनोज कुंभार हे आपल्या आई-वडिलांसह राहत होते. वडील बाहेर गावी गेले होते. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे मनोज आणि त्यांची आई हे जेवण करून घरामध्ये गाढ झोपले होते.
बाहेर जोरात पाऊस पडत होता. मात्र पहाटेच्या सुमारास घरातील भिंतीचे दगड – माती पडल्याचे आवाजाने दोघेही जागे झाले. काही समजण्याच्या आतच ते बाहेर पडण्यासाठी निघाले असता घरातील जमीन अचानक खचून यामध्ये मनोज आणि त्यांची आई खड्ड्यात अंदाजे १० फूट खोल व २० फूट लांब असणाऱ्या भुयारात दोघेजण अडकले गेले.
त्यांच्या अंगावर भिंतीचे दगड ,धोंडे, माती पडल्याने ते वेळीच सावध होऊन मनोज व त्यांच्या आईने स्वतःचे प्राण वाचवले. यात ते दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत.
ही वार्ता सकाळी गावात समजतात गावातील लोक घर पाहण्यासाठी गर्दी करू लागले. गावातील मंडळींनी कुंभार कुटुंबाची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला.