सोलापूर : सोलापूर शहर पोलिस मुख्यालयातील कॉन्स्टेबल संजय सावरे यांना काल बुधवारी आयुक्तालयातील पोर्चमध्ये हृदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. ही दुर्दैवी घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली.
मृत पोलिस कॉन्स्टेबल संजय सावरे हे आयुक्तालयात ड्रिल मास्टर म्हणून कार्यरत होते. पोलिस भरती झालेल्या नवीन मुलांना ते ड्रिल शिकण्याचे प्रशिक्षण देत होते. त्यामुळे सर्वजण त्यांना मास्तर म्हणूनच ओळखत होते. त्यांच्याकडे पोलिस मुख्यालयातील पोलिसांच्या घरांची देखभाल व सफाई कामगार यांच्यावर लक्ष ठेवून काम करून घेण्याचे काम होते.
काल बुधवारी मास्टर सावरे हे कामानिमित्त पोलिस आयुक्तालयात आले होते. त्यांचे काम झाल्यावर दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ते आयुक्तालयातील पोर्चमधील माहिती कक्षाच्या समोर आले. चालतानाच त्यांना अचानक हृदविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. तत्काळ तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना पोलिस गाडीतून खासगी रूग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी संजय सावरे यांना मृत घोषित केले.
* पाच जणांनी मारहाण करून एकास लुटले
सोलापूर : हॉटेलमध्ये जेवण करत असताना एका काळ्या रंगाच्या वाहनांमधून आलेल्या पाच जणांनी एकास मारहाण करीत लूटमार केल्याची घटना ५ ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वशिम भाईजान यांच्या हॉटेल समोरील मार्केट यार्ड सोलापूर येथे घडली.
याप्रकरणी फारूक करीम शेख (वय-४०,रा.मित्र नगर,शेळगी,हैदराबाद रोड,सोलापूर) यांनी जेल रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून कृष्णा चेकीला (रा.शांती नगर,सोलापूर),अंकुश ओंकार फुलसे उर्फ गदर (रा.जुने घरकुल,सोलापूर),गोट्या उर्फ प्रथमेश प्रेम कन्ना (रा.कन्ना चौक, सोलापूर) छोट्या (पत्ता माहीत नाही) व अनोळखी एक इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
फिर्यादी व त्यांचा मित्र इरफान बाबा शेख असे दोघे मिळून हॉटेल वसिम भाईजान समोर बसून जेवण करत होते. त्यावेळी अचानकपणे एका मारुती वाहनमधून हे आरोपी वाहनाच्या खाली उतरून फिर्यादी फारुक शेख यांना तुझ्याजवळ किती पैसे आहेत ते आत्ताच्या आत्ता काढून दे नाहीतर बघ असे म्हणून धमकी देऊन तोंडावर चपलेने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
त्यानंतर फिर्यादी यांच्याकडील आठशे रुपये व हातातील अठराशे रुपये किमतीची मनगटी घड्याळ जबरदस्तीने काढून घेऊन मारुती गाडी मधून निघून गेले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद जेल रोड पोलिस ठाण्यात झाली असून,याचा पुढील तपास पोसई शेख हे करित आहे.
* महिलेचा गळा दाबून तोंडात बळजबरीने पाजले विष
सोलापूर : जामीन मंजूर होऊ नये यासाठी न्यायालयात अर्ज का केला? या कारणावरून एका महिलेचा गळा दाबून तिच्या तोंडात बळजबरीने विष पाजल्याची घटना न्यायालयात समोरील वैद्यकीय महाविद्यालय जवळ बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.
ती ३५ वर्षीय महिला काल मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास न्यायालयातून बाहेर येऊन पायी घराकडे निघाली होती. त्यावेळी काशिनाथ बुरुबुरे आणि त्याच्या साथीदाराने तिला वाटेत अडविले. आणि तू जामीन नामंजूर होण्याकरिता अर्ज का केली, असे म्हणून तिचा गळा दाबून तोंडात विषारी द्रव ओतले. त्यानंतर ती महिला स्वतः उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाली. या घटनेची नोंद जेलरोड पोलिस झाली आहे .