अक्कलकोट : कोरोना संसर्गाची दुसरी लाट व लॉकडाऊनमुळे गेल्या साडेसहा महिन्यांपासून बंद असलेले राज्यातील मंदिरे शासनाने घटस्थापनेच्या मुहूर्तावर उघडण्याचे जाहीर केले. त्यानुसार आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे स्वामी समर्थांचे मंदीरही अपंग सेवेकऱ्याच्या हस्ते मंदीराचं द्वार दर्शनाकरिता खुले केले आहे.
आज पहाटे ४:४५ वाजता मंदिरातील अपंग सेवेकरी संतोष सलगरे यांच्या हस्ते व चेअरमन महेश इंगळे तसेच फलटण येथील निस्सीम स्वामी भक्त अतुल कापडी व कुटूंबियांच्या प्रमुख उपस्थितीत द्वार उघडले. पहाटे ५ वाजता सदर मान्यवरांच्या उपस्थितीत श्रींची काकड आरती संपन्न झाली.
स्वामींच्या दर्शनासाठी आतूर असलेले भाविक आज पहाटेपासूनच स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने व श्रध्देय भक्ती भावाने उपस्थित होते. स्वामींचे राज्यभरात लाखो भक्त आहेत. जवळपास साडे सहा महिन्यांनंतर झालेल्या दर्शनामुळं भाविकांच्या नयनात स्वामी भक्तीच्या उत्सुकतेचं चित्र पहायला मिळालं. मंदिर उघडल्यावर स्थानिक नागरिकांसह अन्य जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी स्वामींचं दर्शन घेत समाधान आणि आनंद व्यक्त केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव कमी झाला असला तरी त्याचा प्रादूर्भाव आद्याप पूर्णपणे ओसरला नाही. त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार एका तासात अंदाजे १०० भाविक दर्शन घेतील, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले.
अक्कलकोट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अमर पाटील यांनी मास्क व सॅनिटायझर थर्मल स्कॅनर मंदिर समितीस उपलब्ध करून दिले. भाविकांच्या सोईकरीता मंदिर समितीच्या वतीने मंदिरातील परिसरात विविध ठिकाणी सॅनिटायझरची सोय केली आहे. भाविकांना मंदिरात प्रवेश करत असताना आपापल्या मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत या प्रसंगी मार्गदर्शन केले.
आजपासून नियमितपणे कोरोना विषयी जनजागृती म्हणून मंदिर समितीद्वारे वेळोवेळी शासनाच्या कोरोना बद्दलच्या गाईडलाईन्सचे अनाउन्समेंट केले जाणार आहे.
या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, सविता कापडी, यश कापडी, संजय पवार, श्रीशैल गवंडी, अविनाश क्षीरसागर, संतोष पराणे, प्रसाद सोनार, सिध्दू कुंभार, विपूल जाधव, संतोष जमगे, ज्ञानेश्वर भोसले, गिरीश पवार, सचिन पेठकर, संदीप दुधनीकर, अमर पाटील, प्रसन्न हत्ते, रामचंद्र समाणे, अरूण चव्हाण, गणेश इंगळे, नागनाथ गुंजले, चंद्रकांत कवटगी, महेश मस्कले व इंगळे कुटूंबीयांसह भाविक उपस्थित होते.