नवी दिल्ली : एक दिवस भाजपवाले एक दिवस महात्मा गांधींना हटवून सावरकरांना राष्ट्रपिता करतील, असे ट्विट एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. ज्यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप लावण्यात आला होता आणि ज्यांना जस्टिस जीवन लाल कपूर यांच्या चौकशीत दोषी ठरविण्यात आलं होतं, असे ओवेसी म्हणाले.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्या सूचनेवरून ब्रिटिशांकडे दया याचिका केली होती’, असं विधान देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. त्यांच्या विधानावरून आता वादविवाद सुरू झाला आहे. राजनाथ सिंह यांनी केलेल्या या दाव्यावरून एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. इतिहास विकृत करून सांगितला जात असल्याची टीका ओवैसी यांनी केली आहे.
उदय माहूरकर आणि चिरायू पंडित लिखीत ‘वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल मंगळवारी दिल्लीत पार पडला. या प्रकाशन सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी सावरकरांच्या माफीनाम्याबद्दलचं विधान केलं.
या विधानावरून आता इतिहास अभ्यासकांसह राजकीय नेतेही भाजपवर टीका करत आहेत. राजनाथ सिंह यांच्या विधानावर बोलताना खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, ‘ते (भाजप) विकृतपणे इतिहास कथन करत आहेत. जर हे असंच सुरु राहिलं, तर ते महात्मा गांधी यांना हटवतील आणि सावरकरांना राष्ट्रपिता बनवतील; ज्यांच्यावर महात्मा गांधी यांच्या हत्येचा आरोप लावण्यात आला होता आणि त्यांना न्यायमूर्ती जीवनलाल कपूर यांच्या चौकशीत दोषी ठरवण्यात आलं होतं’, अशी टीका ओवैसी यांनी केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* सावरकरांचा अपमान हा माफ न करता येण्यासारखा गुन्हा : राजनाथ सिंह
नवी दिल्ली : हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, पण स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान काही विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केले आणि ते आता सहन केले जाणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन,या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राजनाथ सिंह बोलत होते.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, ‘राष्ट्र नायकांचं व्यक्तिमत्त्व आणि कार्याबद्दल वादविवाद होऊ शकतात, परंतु वीर सावरकरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणं आणि त्यांचा अपमान करणं हे सहन केलं जाणार नाही. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं योगदान हे काही विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केलं.’
सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे अनेक दया याचिका दाखल केल्या, हे सातत्यानं सांगितलं जातं. पण सावरकरांनी सुटकेसाठी याचिका दाखल केल्या नाहीत. साधारणपणे कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. तुम्ही दया याचिका दाखल करा, असं महात्मा गांधी म्हणाले होते. गांधीजींच्या या सूचनेनंतर त्यांनी दया याचिका दाखल केली होती. महात्मा गांधींनीही त्यावेळी सावरकरांना सोडून द्यावं, असं आवाहन ब्रिटिशांना केलं होतं.’
‘तेव्हा गांधीजींनी असंही म्हटलं होतं की, ज्याप्रकारे आम्ही शांततेनं स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत तशाच पद्धतीनं सावरकर देखील स्वातंत्र्य चळवळ सुरु ठेवतील. पण त्यांना असं बदनाम केलं जातं की, सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती. क्षमायाचना केलेली किंवा आपल्या सुटकेची मागणी केली होती.’