सोलापूर : भिशीच्या नावाखाली रीना श्रीकांत पवार या महिलेची ८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भिशीचे चालक नारायण वसंत दांडगे त्याची पत्नी अ.ना. दांडगे आणि मुलगा ऋषिकेश दांडगे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायदंडाधिकारी एस.एम. कनकदंडे यांनी नुकताच जारी केला आहे. भिशीत अशा प्रकारे फसवणुकीच्या घटना घडत असल्याने बँकेत पैसे ठेवण्याचा सल्ला अर्थतज्ञ देतात.
यात हकीकत अशी की, फिर्यादी रीना पवार यांचे अशोक चौक येथे भांडे विक्रीचे दुकान आहे. फिर्यादीचे नातेवाईक सौ. दांडगे यांच्यासह तिघांनी फिर्यादीची भेट घेतली. आपल्याकडे दरमहा भिशी भरल्यास चांगला आर्थिक लाभ मिळतो त्यांचा व्यवहार पारदर्शक व प्रामाणिक आहे असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीस आमिष दाखवून तिस दरमहा भिशी भरण्यास प्रवृत्त केले आरोपी जवळचे नातेवाईक असल्याने फिर्यादीने आरोपीचा विश्वास ठेवला त्याप्रमाणे फिर्यादीने २० जानेवारी २०१८ पासून रुपये दहा हजाराची जून २०१९ पासून आणखीन वीस हजाराची भिशी भरण्यास सुरुवात केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आरोपीने फिर्यादीस सांगितले की शेवटचा हप्ता घेतल्यास नफा जास्त मिळतो त्यामुळे फिर्यादीने शेवटची भिशी घेण्याचे ठरवले. आरोपीने एकाही भिशी सोडत फिर्यादीस बोलविले नाही. भिशीमध्ये अन्य कोण ग्राहक आहेत याची माहिती दिली नाही परंतु गोड बोलून फिर्यादीच्या घरी येऊन दरमहा भिशीचा हप्ता घेऊन जात असे.
भिशीचा ठरलेला कालावधी संपल्यानंतर आरोपींनी फिर्यादीस ८ लाख देणे अपेक्षित होते. परंतु भिशीचा कालावधी संपल्यानंतर देखील आरोपीने रक्कम देण्यास टाळाटाळ केली. फिर्यादीने अधिक तगादा लावला आरोपींनी फिर्यादीस जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या संदर्भात फिर्यादीने पोलिसात तक्रार केली. परंतु पोलिसांनी दखल घेतली नाही. त्यामुळे फिर्यादीने आरोपीविरुद्ध न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली.
ॲड. प्रशांत नवगिरे यांनी खाजगी फिर्याद दाखल करून आरोपीने कशाप्रकारे फिर्यादीचा विश्वास संपादन करून भिशीच्या नावाखाली कशी आर्थिक फसवणूक केली याचा युक्तिवाद न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने सदर बाजार पोलीसांना आरोपी विरुद्ध भादवि कलम ४२० आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचा आदेश दिला.
यात फिर्यादी तर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. आकाश देठे, ॲड.श्रीनिवास म्हेत्रे, ॲड.श्रीपाद देशक यांनी काम पाहिले.