बीड : दसरा मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यासोबतचं भाजपवर टीका करत घरचा आहेर दिला. त्या म्हणाल्या, विरोधी पक्षातील प्रत्येक जण म्हणतोय हे सरकार पडणार आणि सत्तेतील लोक म्हणतात आमचं सरकार खंबीर आहे. सरकार पडणार आणि नाही पडणार याच्या बाहेर तुम्ही येणार की नाही?, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला.
बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील भगवान गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मोठी गर्दी उसळली होती. या गर्दीपुढे नतमस्तक होत त्यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर भाषण केले.
भगवानबाबांची शक्ती आणि गोपीनाथ मुंडे यांची शक्ती यांची परंपरा जपणारा हा मेळाव असून देशात इतका देखणा सोहळा कुठेही पाहायला मिळणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. लोकांना दिशा देण्यासाठी हा मेळावा असल्याचे त्यांनी सांगितले. पंकजा मुंडे यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. हेलिकॉप्टरमधून त्यांनी जनसमुदायावर पुष्पवृष्टी केली. त्याबाबत बोलताना, कुणा नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी मी फुले उधळली नाहीत तर तुमच्यासाठी ही फुलांची उधळण होती, अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सत्ताधाऱ्यांवर टीका करताना त्यांनी स्वपक्षालाही खरमरीत सल्ला दिला. या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी आपल्या खास शैलीत भाषण करुन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आपल्या भाषणातून पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यासोबतच भाजपवर टीका करत घरचा आहेर दिला आहे.
विरोधी पक्षातील प्रत्येक जण म्हणतोय हे सरकार पडणार आणि सत्तेतील लोक म्हणतात आमचं सरकार खंबीर आहे. सरकार पडणार आणि नाही पडणार याच्या बाहेर तुम्ही येणार की नाही? सरकार पडणं आणि मजबूत आहे महत्त्वाचं नाही जनतेसाठी काय करता यावर बोला असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
सरकार पडणार की नाही, यावरच सगळे अडकले आहेत. विरोधी पक्ष सरकार पडण्याचे रोज मुहूर्त देत आहे तर सत्ताधारी सरकार पडणार नाही, असे सांगत आहेत. हे किती दिवस चालणार. आता तरी यातून बाहेर पडा, असे सांगतानाच विरोधी पक्षाने आणि सत्ताधाऱ्यांनी आपापली भूमिका पार पाडली पाहिजे. त्यावर लक्ष दिलं पाहिजे, असा सल्लाच पंकजा यांनी दिला.
माझं लक्ष सरकार कधी पडणार याकडे नसून जनहिताची कामे होतात की नाही, याकडे असल्याचेही त्या म्हणाल्या. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. हे तिन्ही पक्ष एकमेकांना खूश करण्यात मग्न आहेत. यात जनतेचे नुकसान होत असल्याची टीका पंकजा यांनी केली. काहींनी मंत्रिपद भाड्याने दिले आहे, असे नमूद करत अप्रत्यक्षपणे त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. आयुष्यात आपल्याला जे मिळालं नाही त्यासाठी रडत न बसता आपल्याला जे मिळालं आहे त्यात समाधान मानलं पाहिजे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.