दुबई : आयपीएलच्या 14 व्या हंगामाचे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्सने पटकावले. चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. चेन्नईचे हे आयपीएलचे चौथे जेतेपद आहे. यासह चेन्नईने एका पराक्रमाची नोंद केली. चेन्नईने चारही विजेतेपद महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पटकावली आहेत. दरम्यान, मुंबईनंतर आयपीएलचे सर्वाधिक जेतेपदे जिंकणारा चेन्नई दुसरा संघ ठरला. मुंबईने पाच जेतेपद पटकावली आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा 27 धावांनी पराभव करत चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2021 ही स्पर्धा जिंकली. चेन्नईचे चौथे विजेतेपद आहे. चेन्नईने विजयासाठी दिलेले 193 धावांचे आव्हान कोलकाताला पेलवले नाही आणि मॉर्गनचा संपूर्ण संघ 165 धावाच करू शकला. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचे हे चौथे विजेतेपद आहे. याआधी चेन्नईने धोनीच्या नेतृत्वाखाली 2010, 2011 आणि 2018 या वर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. मुंबईने आयपीएलची पाच विजेतेपदे जिंकली आहेत. पण यंदाच्या विजेतेपदासह चेन्नईने एक खास विक्रम नावावर केला, जो इतर कोणालाही करता आलेला नाही. चेन्नईने आता आयपीएल सुरू झाल्यापासून प्रत्येक दशकात जेतेपद पटकावण्याचा खास विक्रम नोंदवला आहे.
विजयासाठी 193 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाता व्यकटेश अय्यर आणि शुभमन गिल (51) या जोडीने दमदार सुरुवात दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 91 धावांची भागिदारी केली. व्यकटेश अय्यर शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर 50 धावा काढून बाद झाला. ही जोडी फुटल्यानंतर कोलकाताचा डाव कोसळला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोलकाताचे एकामागोमाग एक गडी बाद होत गेले. राणा शून्य, नारायण 2, मॉर्गन 4, कार्तिक 9, शाकीब अल-हसन शून्य, राहुल त्रिपाठी 2 यांनी मैदानात हजेरी लावण्याचे काम केले. मावी (20) आणि फर्ग्यूसन (18) यांनी फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली, मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. चेन्नईकडून शार्दुल ठाकूर याने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर रविंद्र जाडेजा, जोश हेझलवूडने प्रत्येकी दोन आणि दीपक चहर याने एक बळी घेत त्याला चांगली साथ दिली.
तत्पूर्वी चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 192 धावांचा डोंग उभारला. चेन्नईकडून सलामीवीर ड्यू प्लेसिस याने सर्वाधिक 86 धावा केल्या. मोईन अलीने 37, रॉबिन उथप्पाने 31 आणि ऋतुराज गायकवाड याने 72 धावांचे योगदान दिले.
काल आयपीएलचा करंडक उंचावून स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी संघाचा कर्णधार म्हणून धोनीने विक्रम केला. चेन्नईला चौथ्यांदा चॅम्पियन बनवल्यानंतर धोनी आयपीएल जिंकणारा सर्वात जास्त वयाचा कर्णधारही बनला आहे. चेन्नईने ट्रॉफी जिंकल्यानंतर सगळ्या जगाला एकच प्रश्न पडला, धोनीने एकदिवसीय, कसोटी आणि टी 20 अशा क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. अशा परिस्थितीत, आयपीएल खेळणारा धोनी आता यापुढचं पर्व खेळणार का?, वयाची चाळीशी ओलांडलेला धोनी आयपीएलचा पुढील हंगाम खेळेल का? फॅन्सच्या याच प्रश्नाचं उत्तर ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनीने देण्याचा प्रयत्न केला.