नवी दिल्ली : केरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. येथे मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या 21 वर पोहोचली आहे. यातील 13 लोकांचा कोट्टायममध्ये तर 8 लोकांचा इडुक्कीमध्ये मृत्यू झाला. भूस्खलन ग्रस्त भागात सातत्याने बचावकार्य सुरू आहे. तसेच समोर आलेली परिस्थिती भीषण असल्याचं केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले. केरळमधील परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे, असं गृहमंत्री अमित शहा म्हणाले.
पावसामुळे निसर्गाच्या कहराला सामोरे जाणाऱ्या केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हवाई दलही मदतीसाठी मैदानात उतरले आहे. याशिवाय लोकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या 11 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. कोट्टायम जिल्ह्याच्या आसपासच्या भागात पावसामुळे पूरसदृश परिस्थिती आहे.
कोट्टायममध्ये पावसामुळे नद्यांना उधाण आले असून नद्यांच्या काठावर बांधलेली अनेक घरे कोसळली आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे मोठी वाहने वाहून गेली. नदीच्या काठावरही मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यात आतापर्यंत 26 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोकं बेपत्ता आहेत. कोट्टायममध्ये पावसाचा सर्वात जास्त परिणाम दिसून येत आहे. कोट्टायममध्ये आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर इडुक्कीमध्ये नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय, अल्लाप्पुझा जिल्ह्यात 4 लोकांचा मृत्यू झाला आहे, पावसामुळे, पठाणमथिट्टा आणि इडुक्कीमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट आहे.
केरळ राज्यातील पथनमथिट्टा, कोट्टयम, एर्नाकुलम, इडुक्की आणि थ्रिसूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात पूर आल्याने मीनाचल आणि मणिमाला या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. केरळचे मुख्यमंत्री या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवत असून त्यांनी आलेली परिस्थिती भीषण आहे, नागरिकांनी चोवीस तास आपल्या घरात राहावे अशी विनंती जनतेला केली आहे.
अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पावसामुळे सध्या दक्षिण आणि मध्य भागातल्या जिल्ह्यांना फटका बसलेला असून संध्याकाळपर्यंत पावसाची तीव्रता आणखी वाढून उत्तरेकडच्या जिल्ह्यांना त्याचा सर्वात जास्त फटका बसण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. धरण आणि नदीपात्रात वाढत चालेल्या पाणीपातळीचा विचार करून आसपास राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.