भंडारकवठे : दक्षिण सोलापूर तलुक्यातील वडापूर येथे काल सोमवारी दुपारच्या सुमारास अनैतिक संबंधाच्या कारणावरुन कोयत्याने सपासप वार करुन खून केला. त्यातील आरोपी अमोगसिध्द भीमू पुजारीस आज ग्रामसुरक्षा यंत्रणा आणि मंद्रुप पोलिसांनी वडापूर हद्दीत अटक केली.
ज्ञानदेव प्रभू नागणसूरे (वय ५५ रा.वडापुर ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुलगा दत्तात्रय नागणसुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंद्रुप पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी अमोगसिद्ध भीमू पुजारी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मंद्रुप पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत ज्ञानदेव नागणसूरे हे वडापूर- विंचूर रस्त्यावरील आपल्या शेतातील गवत आणण्यासाठी सायकलवरून गेले होते. त्यांच्या शेताजवळील तुळशीराम हक्के यांची शेती संशयित आरोपीने करण्यास घेतली आहे.
ज्ञानदेव नागणसूरे हे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सायकलवरून गवत घेऊन निघाले. रेवणसिद्ध पुजारी यांच्या वस्तीजवळ येताच पाठीमागून संशयित आरोपी अमोगसिद्ध पुजारी यांनी हातातील कोयत्याने त्यांच्यावर वार केला. यामुळे ते सायकलवरून खाली उसाच्या शेतात पडले. तेव्हा आरोपींनी त्यांच्या मानेवर डोक्यात तोंडावर सर्वत्र सपासप कोयत्याने वार केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गंभीर जखमा झाल्याने व रक्तस्राव होऊन ज्ञानदेव नागणसूर यांचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर पुजारी हा घटनास्थळावरून पळून गेला. दहा वर्षापूर्वी पुजारी याने माझ्या वडिलांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीचा खून केला. शिक्षा भोगून जामिनावर आल्यानंतर याच संशयावरून त्याने माझ्या वडिलांचा खून केल्याची फिर्याद मुलगा दत्तात्रय नागणसुरे यांनी दिली आहे.
तपासात जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. नितीन थेटे, पीएसआय अमितकुमार करपे, अल्लाबक्ष सय्यद तसेच एएसआय लिगेवान, मुलाणी, हवलदार महिंद्रकर, श्रीकांत बुरजे, व्हनमाने, कोळी, काळे व वाघमारे यांच्या पथकाने कारवाई केली.
* ग्राम सुरक्षा यंत्रणेनेची मदत
ज्ञानदेव नागणसूरे या व्यक्तीचा त्याच गावात राहणारा व पॅरोल रजेवर आलेला आरोपी आमोगसिद्ध भिमु पुजारी याने धारदार शस्त्राने खून केल्याने गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार आरोपीचा कालपासून वाडी वस्ती, आरोपीचे नातेवाईक, एस टी स्टँड येथे कसून शोध घेत होते. आज मंगळवारी (१९ ऑक्टोबर) आरोपी अंत्रोळी- विंचूर अंतर्गत रस्त्यावर आल्याची माहिती खब-याकडून मिळाली.
लगेच सायंकाळी ४.५० वाजता मंद्रूप पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमित करपे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर १८००२७०३६० चा वापर करून अमोगसिद्ध भिमू पुजारी हा खुनातील आरोपी, आंत्रोळी- विंचूर या गावांमध्ये पायी चालत चालला आहे. सर्व गावकऱ्यांना ही माहिती दिली. तसेच आंत्रोळी गावच्या महिला सरपंच यांनी गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. सर्व गावकरी रस्त्यावर आले व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले. ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे व मंद्रुप पोलिसांच्या प्रयत्नाने खुनातील आरोपी जेरबंद होण्यास मदत झाल्याचे डाँ. नितिन थिटे ( सहाय्यक पोलिस निरीक्षक,मंद्रुप) यांनी सांगितले.