कुर्डूवाडी : डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे, ऊस वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरचा पगार आणि वाहनांच्या स्पेअर पार्ट च्या किमती देखील दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वानवा दर वाढवून मिळावी या मागणीसाठी जनशक्ती संघटनेने महाराष्ट्रभर वेगवेगळी आंदोलने केली. यामुळेच ऊस वाहतूकदराची कोंडी फोडणाऱ्या ‘चेअरमन’ची हत्तीवरून मिरवणूक काढण्याची घोषणा केली आहे.
सध्या ऊस वाहतूक दारांचा संप पुकारला आहे. मात्र तरीही महाराष्ट्रातील एकाही साखर कारखान्याच्या चेअरमनला ऊस वाहतूकदारांबाबत आत्मीयता दिसून आली नाही. त्यामुळे बंद आणि संप आणखीनच तीव्र झाला आहे. दरम्यान जो कारखानदार ऊस वाहतूक दराची कोंडी फोडेल त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार असल्याची घोषणा जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, डिझेलच्या किमतीत वाढ झाली असताना देखील कारखानदार मात्र ऊस वाहतूक दराबद्दल अनभिज्ञ आहे. ऊस वाहतूक करणारा वाहन मालक मात्र तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत आहे. एकीकडे ऊस तोड कामगार, कारखान्याचे कर्मचारी, साखरेचे दर वर्षाला वाढत असतात. मात्र दुसरीकडे कारखान्याला ऊस पुरवठा करणारा वाहन मालक मात्र या वाढीपासून कोसो दूर ठेवला आहे. त्यामुळे कारखानदारांकडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांवर अन्याय होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ट्रॅक्टर व ट्रकची संख्या वाढली. त्यामुळे एक गेला तर दुसरा येईल अशी समजूत कारखानदारांची झाली आहे. तर घरी बसून अथवा वाहन घरी ठेवून राहण्यापेक्षा किमान हमाली तर मिळेल या अपेक्षेवर वाहन मालक जगतो आहे. त्यामुळे कारखानदारांनी वाहन मालकाच्या कुटुंबाचा विचार करून डिझेलच्या पटीत वाहतूक दर वाढवून द्यावा अशी आमची मागणी आहे.
त्यामुळे जोपर्यंत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांना वाहतूक दर वाढवून मिळत नाही तोपर्यंत ऊस वाहतूक बंद राहील, असे सांगून या वाहतूकदारांची जो कारखानदार कोंडी फोडेल त्याची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
यावेळी बालाजी धायगुडे, कानिफनाथ आयीरे, राजेंद्र पवार, प्रकाश सोरोटे, जगदीश देवकते, भगवान पाटील, नाना पवार, शिरीष रणदिवे, लालासो रणदिवे, विशाल माने, संतोष चव्हाण, जोतिराम ढोबळे यांच्यासह जनशक्ती वाहतूक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. उसदरावरुन आंदोलन होतात पण उसवाहतूक दराची कोंडीविषयी सहसा कधी आंदोलन होत नाहीत. मात्र या संघटनेने हा विषय हाती घेऊन लक्ष वेधले आहे.