सोलापूर : बार्शी तालुक्यातील भातंबरे गावात गोळीबारची घटना घडलीय. एका एसआरपीएफ जवानाने आपल्या सासुरवाडीच्या लोकांवर गोळीबार केला आहे. गोरोबा महात्मे असे त्या जवानाचे नाव आहे. वैराग पोलिसांनी त्यास अटक केलीय.ही घटना बुधवारी रात्री पावणे अकराच्या दरम्यान घडली. वैराग पोलिस ठाण्यात पोलिसाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
काशीनाथ काळे (रा. सापनाईता, कळंब) यांनी फिर्याद दाखल केली. नितीन बाबूराव भोसकर (रा. सापनाई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोळीबारात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एका तरुण जखमी झालाय. गोळीबारात नितीन भोसकर व बालाजी महात्मे यांना गोळी लागून जखमी होऊन खाली पडले तर काशीनाथ काळे व जालिंदर काळे पळून जात असताना गोळीबार केला असता गोळीपासून सुदैवाने बचावले. गोळीबाराची घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.
पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून या जवानाने हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. काल रात्री उशिरा पोलिसांनी आरोपी जवानाला अटक केली आहे. पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत.
नितीन बाबुराव भोसकर असे गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो आरोपी जवानाच्या मेहुण्याचा मित्र होता. तर गोरोबा महात्मे असं अटक केलेल्या आरोपी जवानाचं नाव आहे.
तो बार्शी तालुक्यातील भातंबरे येथील रहिवासी असून सध्या मुंबईत कार्यरत आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक सरकारी पिस्टल आणि 26 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
* मृत नितीन बाबूराव भोसकर
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आरोपी जवान गोरोबा महात्मे याचा हा मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नीसोबत वाद सुरू होता. पत्नीचा बाहेर कोणासोबत तरी प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय जवानाला होता. यातून त्याचे पत्नीसोबत वाद झाले होते. त्यामुळे जवानाची समजूत काढण्यासाठी सासरची मंडळी जवानाच्या घरी आले होते. यावेळी आरोपी जवानाच्या मेहुण्याचा एक मित्र देखील सोबत आला होता.
यावेळी सासुरवाडीच्या मंडळीसोबत बोलणी फिसकटल्याने जवानाने रागाच्या भरात जमलेल्या लोकांवर गोळीबार केला. आरोपी एसआरपीएफ जवानाने चार गोळ्या झाडल्या.
आरोपी जवानाच्या मेहुण्याचा मित्र नितीन बाबुराव भोसकर याला गोळी लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकजण गोळीबारात जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी जवानाला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक सरकारी पिस्टल आणि 26 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या घटनेचा पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत.
* आष्टीत दोन गटात हाणामारी, ५ जखमी २० जणांवर गुन्हा