नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ‘ठाकरे सरकारचे मंत्री विजय वडेट्टीवारांचे आरोप पूर्णतः निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे. फडणवीस हे माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. एकमेकांच्या विरोधात काड्या करणे आणि एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे तशा प्रकारचा संभ्रम काँग्रेसचे मंत्री वडेट्टीवार आमच्याही बाबतीत निर्माण करू पाहत आहेत.
‘भाजपमध्ये दोन टोकं आहेत. एकीकडं नितीन गडकरी आहेत तर दुसरीकडं देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. फडणवीसांची मला जिरवायचीच होती आणि जिरवून टाकली. आता पुन्हा जिरवणार आहे असं गडकरी मला एकदा बोलता बोलता म्हणाले होते,’ असा राजकीय गौप्यस्फोट वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात केला होता. त्यावर गडकरी यांनी वेळ न घालवता तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची हे भाजप नेते नितीन गडकरी यांच्याशी बोलून आधीच ठरवलं होते. तसेच देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्ये 36 चा आकडा असलाचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला होता. नांदेड येथील बिलोली येथील प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना वडेट्टीवार यांनी हा दावा केला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नागपूरवाल्यांना माहित आहे. तिकडे भाजपमध्ये दोन टोके आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस तर दुसरीकडे नितीन गडकरी, दोघांची तोंडं विरुद्ध दिशेला आहेत. दोघांमध्ये 36 चा आकडा आहे. म्हणून गडकरींनी कानामध्ये गुपचूप सांगितले की, फडणवीसांची जिरवायची होती. तशी ती जिरली. आता पुन्हा जिरवायचीय. पण कुणाची जिरेल ते कळेल. मात्र मी सांगतो पुढचं केंद्रातील सरकार मात्र बदलणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले होते.
‘वडेट्टीवारांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे. फडणवीस हे माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. एकमेकांच्या विरोधात काड्या करणे आणि एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे तशा प्रकारचा संभ्रम काँग्रेसचे मंत्री वडेट्टीवार आमच्याही बाबतीत निर्माण करू पाहतात, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
‘फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्राची प्रगती झाली. विरोधी पक्ष नेते म्हणूनही ते उत्तम काम करीत आहेत. महाविकास आघाडीच्या चुकांवर नेमके बोट ठेवून ते लोकशाहीतील विरोधकांचे कर्तव्य निभावत आहेत. सरकार तीन पक्षांचे असले तरी काँग्रेसमध्ये नैराश्य आहे. त्यांना कुणीही मोजत नाही. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी वडेट्टीवार यांच्यासारखे काँग्रेसी नेते अशा प्रकारची वक्तव्ये करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात,’ असा टोलाही गडकरी यांनी हाणला आहे.