लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष कामाला लागला आहे. राज्यातील भाजप कार्यकर्त्यांची संख्या 4 कोटींच्या घरात नेण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं उत्तर प्रदेशात 403 पैकी तब्बल 312 जागा जिंकल्या. मात्र यातील चांगली कामगिरी नसलेल्या जवळपास 100 आमदारांचं तिकीट कापण्याच्या तयारीत भाजप आहे. त्यांच्या जागी निवडणुकीत इतरांना संधी मिळू शकते.
पुढील वर्षी होत असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष कामाला लागला आहे. देशातलं सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमधील सत्ता राखण्यासाठी भाजपनं व्यूहरचना आखण्याचे काम चालू केली आहे. विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लखनौचा दौरा करणार आहेत. भाजप सदस्यता अभियानाचा शुभारंभ करून ते पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत शाह यांना पीएम मोदींनी ‘मॅन ऑफ द सीरिज’ घोषित केलं होतं आणि शाह यांनी ते सिद्धही करुन दाखवलं. आता पुन्हा एकदा शहा अशीच काहीशी व्यूहरचना आखत असल्याचं दिसत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील भाजप कार्यकर्त्यांची संख्या 4 कोटींच्या घरात नेण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. या कार्यकर्त्यांच्या जोरावर सत्ता टिकवण्याचा भाजपचा मानस आहे. याशिवाय तिकीट वाटपाबद्दलही महत्त्वाची चर्चा होऊ शकते. त्यासाठीच अमित शाह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
या यादीत कोणत्या नेत्यांचा समावेश असणार, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. या नेत्यांची संख्या जवळपास 100 पर्यंत जाऊ शकते. दरम्यान, 2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष बळकट करण्यासाठी इतर पक्षांतून भाजपात आलेल्या, परंतु हायकमांडच्या अपेक्षेप्रमाणे न वागलेल्या भाजप आमदारांचा यात समावेश असल्याचे भाजपच्या सूत्रांचं म्हणणं आहे. यात काही दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. ज्यांचं काम समाधानकारक नाही, शिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा ते खराब करू शकतात, अशांचा पत्ता कट होणार असल्याचं पक्षातून माहिती आहे.
अमित शाह यांनी गेल्या काही वर्षांपासूनच उत्तर प्रदेशच्या राजकारणात विशेष लक्ष घातलं आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या नेतृत्त्वाखालीच पक्षाच्या राज्यातील जागा 10 वरून थेट 73 वर गेली. त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं तीनशेहून अधिक जागा जिंकल्या होत्या. यात अमित शहा यांचे मोठे योगदान आहे.