पुणे : कोरोनाने आतापर्यंत अनेक कुटुंबातील कमावत्या व्यक्तींचाही मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. महापालिका हद्दीत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना 25 हजार रुपये देणार आहेत.
आधी ही मदत 50 वर्षांवरील नागरिकांसाठी देण्यात येणार होती. मात्र आता सरसकट मदत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी निधन झालेल्या व्यक्तीचे वय पन्नास वर्षे असावे,अशी अट होती. ही अट रद्द करावी, अशी मागणी स्थायी समितीत केली. त्यास मंजुरी दिली आहे.
कै. मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे होते. शहरातील सुमारे पावणेचार हजार नागरिकांचा मृत्यू झाला. कोरोनाने मृत्यू झालेल्यांना पंचवीस हजारांची मदत देता येते. मात्र, त्यासाठी पन्नास वर्षांवरील नागरिकांसाठी ही मदत होती. त्यामुळे अनेक नागरिक मदतीपासून वंचित राहिले होते.
सदस्या भीमाताई फुगे यांनी मदतीसाठी वयाची अट रद्द करावी,अशी मागणी केली. त्याला सर्व सदस्यांनी अनुमोदन देत यामधील निधन व्यक्तींच्या वयाची अटच रद्द करावी, अशी मागणी केली. त्यानंतर सदस्यांची ही मागणी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी मान्य केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* अधिष्ठात्यांना दहा लाखांपर्यंत वैद्यकीय खरेदीचे अधिकार
वैद्यकीय विभाग आणि त्याअंतर्गत रुग्णालये व दवाखाने तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे, साहित्य तसेच सर्व प्रकारची औषधांची खरेदी करण्यात येते.
दहा लाख आणि पाच लाख रुपयांपर्यंत खरेदीचे अधिकार यापूर्वी महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय संचालक आणि वैद्यकीय अधीक्षक यांना प्रदान केले होते. परंतु या अधिकाऱ्यांना दिलेले हे खरेदीचे अधिकार रद्द करण्यात आले आहेत. तसेच यापुढे ही खरेदी मध्यवर्ती भांडार विभाग, मुख्य कार्यालयामार्फत करण्यास 1 नोव्हेंबर 2017 रोजीच्या आदेशानुसार मान्यता देण्यात आली आहे.
महापालिका आस्थापनेवरील विविध विभागांसाठी 5 ऑक्टोबर 2021 रोजीच्या आदेशानुसार, नव्याने विभागप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, वैद्यकीय विभागाकरिता सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आणि वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे यांना विभागप्रमुख म्हणून घोषित करण्यात आले. त्यानुसार डॉ. वाबळे यांच्या कार्यकक्षेत वायसीएम रुग्णालयाचे कामकाज आहे. तर, डॉ. गोफणे यांच्या कार्यकक्षेत सर्व महापालिका रुग्णालये आणि सर्व दवाखान्यांचे कामकाज सोपविण्यात आले आहे.