आखाती देशात सुरू असलेल्या टी २० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ हॉट फेव्हरेट समजला जात होता. भारतीय संघच हा विश्वविजेता होईल असाच विश्वास देशातील १३० कोटी जनतेला होता. मात्र भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात निराशाजनक कामगिरी करून देशवासीयांच्या विश्वासाला तडा दिला आहे.
पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भारतीय फलंदाजांनी हाराकीरी करून सामना गमवला. पाकिस्तान विरुद्ध भारताची निराशाजनक कामगिरी करूनही न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारत दमदार कामगिरी करून पुनरागमन करेल अशी भाबडी आशा क्रिकेट रसिकांना होती मात्र दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाने पहिल्या सामन्याचीच पुनरावृत्ती केल्याने क्रिकेट रसिकांमधून संतापाची भावना व्यक्त होत आहे.
केवळ क्रिकेट रसिकच नाही तर जगभरातील आजी माजी क्रिकेट खेळाडूंनी देखील भारतीय संघावर टीका केली आहे. भारतीय संघाच्या या निराशाजनक कामगिरीची बीसीसीआय पोस्ट मार्टम करणार का हा प्रश्न आहे. भारतीय संघाच्या या निराशाजनक कामगिरीला कोणा एका खेळाडूला जबाबदार न धरता संपूर्ण संघाला आणि संघ व्यवस्थापनाला जबाबदार धरायला हवे.
त्याचबरोबर निवड समिती देखील तितकीच जबाबदार आहे. निवड समितीने फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंकडे दुर्लक्ष करून संघातील प्रतिष्टीत खेळाडूंची निवड केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा काढून ऑरेंज कॅप मिळवणारा ऋतुराज गायकवाड याच्याकडे निवड समितीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. फॉर्ममध्ये असलेल्या ऋतुराज गायकवाडकडे दुर्लक्ष करणे भारतीय संघाला महाग पडले. हार्दिक पांड्या हा अनफिट असूनही त्याची संघात निवड केली.
अष्टपैलू म्हणून निवड झालेल्या पांड्याने दोन्ही सामन्यात गोलंदाजी केली नाही. फलंदाजीतही त्याने निराशा केली. भुवनेश्वर कुमारने आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी करूनही त्याची निवड करण्यात आली. वरून चक्रवर्ती पहिल्या सामन्यात फ्लॉप ठरवूनही त्याची दुसऱ्या सामन्यात निवड करण्यात आली. इतकेच नाही तर त्याला पहिली महत्वाची षटके देण्यात आली. वरून चक्रवर्तीला दोन्ही सामन्यात एकही बळी मिळाला नाही. वरून चक्रवर्तीला संधी देताना अनुभवी रवीचंद्रन आश्विनकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. विश्वकरंडकासारख्या म्हत्वाच्या स्पर्धेत अश्विन सारख्या अनुभवी आणि मॅच विनर खेळाडूला डग आऊटमध्ये बसवणे ही चुकच नाही तर महाचूक आहे.
न्यूझीलंड विरुद्ध सलामीला रोहित शर्माच्या जागेवर ईशान किशनला पाठवण्याची संघ व्यवस्थापनाची चाल देखील फ्लॉप झाली. नवख्या ईशान किशनला रोहित शर्माच्या जागेवर पाठवून संघ व्यवस्थापनाने रोहित शर्मावर अविश्वास दाखवला आहे त्यामुळे रोहित शर्माच्या मनोधैर्यावरही परिमाण होऊ शकतो. पहिल्या दोन्ही सामन्यातील फसलेली रणनीती ही विराट कोहलीच्या नेतृत्व क्षमतेवर शंका उपस्थित करणारी नाही. मोठ्या स्पर्धेत विराट कोहलीचे नेतृत्व फिके पडते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. चुकीची संघ निवड, फसलेली रणनीती यामुळे स्पर्धेबाहेर पडण्याची नामुष्की भारतीय संघावर आली आहे.
भारताचे अजूनही तीन सामने आहेत या तिन्ही सामन्यात भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल शिवाय न्यूझीलंडला अफगाणिस्तान कडून हार पत्करावी लागेल तेंव्हाच भारताला उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल अर्थात ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. न्यूझीलंड अफगाणिस्तानकडून हार पत्करेल असे वाटत नाही. त्यामुळे भारतीय संघ स्पर्धेच्या बाहेर पडल्यातच जमा आहे. उरलेले तीन सामने ही केवळ औपचारिकता आहे.
* श्याम ठाणेदार – पुणे