सोलापूर : काँग्रेसभवन समोर गेल्या काही दिवसापासून उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांना आज सकाळीच शहर पोलीसांनी तेथून हुस्कावून लावत काही जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान आम्हाला येथून हुस्कावलं, अटक केली तरी सुटकेनंतर आम्ही पुन्हा जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर आंदोलन करु असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री साखर कारखान्याने थकवलेले ऊसबिल द्यावे, या मागणीसाठी तुळजापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी काँग्रेस भवनसमोर ठिय्या मारला आहे. तुळजापूर तालुक्यातील शेतकरी संघटनेचे नेते अरविंद घोडके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनच्या प्रवेशद्वारावर सलग सहा दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे.
आज बुधवारी दुपारी शेतकऱ्यांचे अटकेचे वृत्त समजल्यानंतर तुळजापूरातून आणखी काही शेतकरी सोलापुरात काँग्रेस भवन परिसरात दाखल झाले आहेत. काँग्रेस भवन येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अक्कलकोट तालुक्यातील रुद्रवाडी येथे असलेल्या मातोश्री साखर कारखान्याकडील शेतकऱ्यांची गेल्या वर्षीची उस गाळप बिलं अद्याप मिळालेली नाहीत. ही बिलं त्वरीत मिळावीत यासाठी हे आंदोलन सुरु आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्याशी संबंधीत हा साखर कारखाना असल्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काँग्रेस भवन येथेच आंदोलन सुरु केलं होतं.
या उपोषणात जवळपास महिला व पुरुष असे शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत. काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासंबंधी अक्कलकोट तालुक्यात मातोश्री साखर कारखाना आहे. या कारखान्याने मागील गळीत हंगामात तुळजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेला आहे.
पण एक रुपयाही ऊसबिल न मिळाल्याने शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला. पण बिल देण्याबाबत आश्वासन देण्यात आले नाही, त्यामुळे आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सलग नऊ दिवस शेतकऱ्यांचे सोलापुरातील काँग्रेस भवन येथे आंदोलन सुरु होते. या शेतकरी आंदोलनाकडे कोणी लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकरी हत्येच्या विषयावर महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद ठेवून निषेध व्यक्त केला. भाजप प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस भवनच्या प्रवेशद्वारात जावून आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. पण शेतकऱ्यांची मागणी मात्र ‘जैसे थे’ असल्याचे चित्र आहे.