अहमदनगर : अहमदनगरमध्ये भीषण आग लागली. जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये ही दुर्घटना घडली. यात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी तातडीने अग्निशमन दल दाखल झाले. काही रुग्णांना सुखरुप दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले. आयसीयुमध्ये एकूण 20 रुग्ण होते. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या ICU विभागात आज सकाळी आग लागली. या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो, असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं. तसेच मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
या आगीत होरपळून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली. कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर काळाने घाला घातला. आज शनिवारी सकाळी अचानक लागलेल्या आगीमध्ये अनेक रुग्ण होरपळले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. ऐन दिवळ सणांमध्ये घडलेल्या या भयावह घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे, असं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितलं. मात्र इमारत आणि वायरिंगही नवीन असताना इतक्यात शॉर्टसर्किट कसं झालं, इमारतीचं फायर ऑडिट झालं होतं की नाही, अग्नीरोधक यंत्रणा आहे की नाही, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ऐन दिवाळीत हे भीषण अग्नितांडव झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तब्बल दहा जणांचा मृत्यू झाल्याने, दहा कुटुंब अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहेत. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही आग शॉर्ट सर्किटनं लागल्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, अहमदनगर जिल्हा रुग्णालयाची इमारत दीड-दोन वर्ष जुनी आहे. त्यामुळे वायरिंग आणि इमारत नवीन असताना अशी घटना कशी घडू शकते? असा प्रश्न उपस्थित होतो.
माहिती मिळताच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. हसन मुश्रीफ कोल्हापुरात होते. “मला आमदार, जिल्हाधिकाऱ्यांचे फोन आले. त्यांनी रुग्णालयाला आग लागल्याची माहिती दिली. मी आता तात्काळ जाऊन माहिती घेईन. नेमकं काय घडलं हे तिथे गेल्यावर कळेल. या घटनेत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करुच, पण दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांना सरकारकडून मदतही दिली जाईल. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
अग्निशामन दलानं युद्धपातळीवर कार्य करत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं. ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले होते. या भीषण आगीचे फोटोज आणि व्हिडीओ समोर आले असून ते पाहून मन सुन्न होतं. कोरोनापासून वाचण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचा आगीनं होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
“जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागात 17 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. यापैकी 10 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं समजतेय. याबाबतची चौकशी सध्या सुरु आहे”
– राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी