सोलापूर : सोलापूर महापालिकेची निवडणूक नियोजित वेळेत होणार की लांबणीवर पडणार, याबाबत संभ्रम आहे. मात्र महाविकास आघाडीचाच महापौर बसवायचा, याबाबत व्यूहरचना चालू असल्याचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांच्या फराळ कार्यक्रमात दिसून आली. महाविकास आघाडीच्या खुमासदार चर्चेनी दिवाळ फराळ कार्यक्रमात चांगलीच रंगत आली.
दिवाळीनिमित्त महापालिका विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांच्या निवासस्थानी आज रविवारी फराळ मेजवानीचा कार्यक्रम झाला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. मात्र महाविकास आघाडीचे नेते मात्र एकत्रित चर्चा करताना दिसून आले. यात प्रामुख्याने माजी महापौर महेश कोठे, सुधीर खरटमल, विद्या लोलगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, शहराध्यक्ष भारत जाधव, शिवसेनेचे पुरुषोत्तम बरडे, गुरुशांत धुत्तरगांवकर, काँग्रेसचे चेतन नरोटे, यू.एन. बेरिया, राजन जाधव, पद्माकर काळे, प्रथमेश कोठे, जुबेर बागवान, अमोल शिंदे यांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा करुन शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असे महाविकास आघाडी करुन महापालिकेची निवडणूक लढवण्याची चर्चा, विचार विनिमय झाला. महापालिकेवर महाविकास आघाडीचा महापौर बसवणे इतके सोपे नाही, भाजपही तयारी करीत आहे. त्यामुळे तिघांनी एकत्र येऊनच महापालिकेची निवडणूक लढवावी लागणार असल्याचा मुद्दा महेश कोठे यांनी मांडला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी शरद पवार यांना सोलापूर शहरात आणून वातावरण निर्मिती करण्याचा मुद्दा मांडला. एमएनसी अर्थात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागण्यापूर्वीच शरद पवारांना सोलापुरात आणून वातावरण निर्मिती करण्याचा विचार व्यक्त केला.
नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले सुधीर खरटमल यांनीही या बैठकीत शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा करुनच महापालिकेवर महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू, असा आशावाद व्यक्त केला.
* काँग्रेसचे चेतन नरोटे का चिडले
फराळ कार्यक्रमात सर्वात जास्त राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती. त्या खालोखाल शिवसेना पदाधिका-यांची. बाहेर सभा मंडपात फराळ कार्यक्रम चालू होता. आणि हे नेते आता बसले होते. या बैठकीत काँग्रेसकडून फक्त चेतन नरोटेंचीच उपस्थिती होती. प्रसारमाध्यमांनी फोटो काढताच चेतन नरोटे चिडले. आम्ही नुसते बसलो आहोत, फोटो काढू नका, अशी त्यांनी विनंती केली. यावर माध्यमांनी महाविकास आघाडीत सर्वांनी मिळून सोलापूल महापालिकेवर महापौर बसवण्याची चर्चा चालू असल्याचे सांगितले. त्यानंतर चेतन नरोटे शांत होऊन चर्चेत सहभागी झाले. मात्र चर्चेसाठी काँग्रेसकडून फक्त आपण एकटेच असल्याची निराशा नरोटेंच्या चेह-यावरुन दिसून येत होती. मात्र काँग्रेसचे गटनेते असल्याने त्यांचा चर्चेतील सहभागही महत्त्वाचा म्हणावा लागेल.
– रामकृष्ण लांबतुरे, कंटेंट हेड – सुराज्य डिजिटल