मुंबई : ऐन दिवाळीत पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, नाशिकसह अनेक ठिकाणी काल पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांना झोडपून काढले. या पावसामुळे भात शेती, वरी, भाजीपाला, टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले. सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी आणि डोळ्यातही पाणी असे विदारक चित्र दिसले.
सांगली जिल्हासह शहरी भागांमध्ये २ नोव्हेंबर रोजी सुमारे एक तास पासून मुसळधार पाऊस सुरू होता. या पडणाऱ्या पावसामुळे शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या अवकाळी पावसामुळे शेती पिकाला मोठा फटका बसणार आहे.तासभरापासून पडणाऱ्या पावसामुळे बाजारपेठांमध्ये दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.
दिवाळीला सायंकाळीही पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरीसह लांजा तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. रत्नागिरी, चिपळूणात तासभर कोसळलेल्या पावसामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. चिपळूणात सुमारे अर्धा तास कोसळलेल्या पावसामुळे भात कापणी करणाऱ्या बळीराजाला फटका बसला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कापणीनंतर सुकवण्यासाठी ठेवलेले भातही भिजले. तालुक्यात अनेक ठिकाणी दिवाळीपूर्व भात कापणीला सुरवात झाली. कापलेल्या भाताची उडवी रचलेली आहे. दिवाळी संपल्यानंतर भात झोडणी केली जाणार आहे. तत्पूर्वी पाऊस पडल्यानंतर कापलेला भातावर पाणी पडले आहे.
चिपळूण शहरासह सावर्डे, अलोरे, पोफळी, खेर्डी, शिरगाव, मार्गताम्हाने, पेढांबे, दसपटी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. पुढील काही दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात सायंकाळी पाच वाजता मुसळधार पावसाला सुरवात झाली. ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत होता.
राज्यात ऐन दिवाळीत पुन्हा एकदा मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या आठ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरीत भागात अद्याप तरी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. उद्यापासून पुढील चार दिवस पुण्यात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकर्यांना चांगल्या पिकाची अपेक्षा होती. मात्र, अवकाळी पावसाने शेतकर्यांचा तोंडचा घास हिरावला आहे.