सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभागाचे कक्ष अधिकारी बसवेश्वर महादेव स्वामी (वय 45) यांना सोमवारी तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
समाज कल्याणच्या सभापती संगीता धांडोरे यांच्या ऍन्टी चेंबरमध्ये कक्ष अधिकारी बसवराज महादेव स्वामी याने तक्रारदाराला बोलावले. त्याठिकाणी कोणी येणार नाही, सभापतीही त्याठिकाणी नसल्याने स्वामी याने लाच घेण्यासाठी ते सुरक्षित ठिकाण निवडले. त्याला त्याच ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. आता ही रक्कम स्वामी याने कोणाच्या सांगण्यावरून घेतली की त्याने स्वत:साठीच मागितली, याचा तपास केल्यानंतर खरे समोर येणार आहे.
गावासाठी निधी मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागातील बसवराज महादेव स्वामी याने तक्रारदाराकडे 30 हजारांच्या लाचेची मागणी केली. दिवाळी सुट्टीपूर्वी ठरलेली रक्कम सुट्टीनंतर आल्यावर देण्याचे ठरले. दिवाळी सुट्टीनंतर कार्यालयात दाखल झालेल्या पहिल्याच दिवशी बसवराज स्वामीला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
मोहोळ तालुक्यातील हिंगणी निपाणी या गावासाठी दलित वस्ती सुधार निधी द्यावा, अशी मागणी सरपंचाने ग्रामसभेतील ठरावाआधारे केली होती. त्यासाठी त्यांनी झेडपीतील समाज कल्याण विभागाचे उंबरठे झिजवूनही निधी मिळत नव्हता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
निधी मंजुरीसाठी कक्ष अधिकारी बसवराज स्वामी याने तक्रारदाराकडे 30 हजारांची लाच मागितली. 2 नोव्हेंबरला ही रक्कम निश्चित करण्यात आली. गुरुवारनंतर (ता. 4) दिवाळी सुट्टी लागणार असल्याने ती रक्कम दिवाळी सुट्टीहून आल्यावर सोमवारी (ता. 8) देण्याचे ठरले होते. त्यानुसार स्वामी याने तक्रारदाराला थेट समाज कल्याण कार्यालयात बोलावून घेतले.
झेडपी परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज स्वामीला आला नाही. सभापतींच्या ऍन्टी चेंबरमध्ये लाचेची रक्कम स्वीकारताना स्वामी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्याला ताब्यात घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात नेण्यात आले. त्याच्याविरुध्द सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. स्वामी याला आता मंगळवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. ही कारवाई लाचलुचपतचे उपअधिक्षक संजीव पाटील, पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, चंद्रकांत कोळी यांच्या पथकाने केली.
* देगाव येथे पतिवर सुरी हल्ला करून
पत्नीच्या अंगावरील दागिने लुटले
सोलापूर – दुचाकी उभी करून लघुशंकेसाठी थांबलेल्या पतिवर सुरी हल्ला करून दोघा चोरट्यांनी पत्नीचा अंगावरील 40 हजाराचे दागिने लुटले. ही घटना देगाव (ता.पंढरपूर) येथे शुक्रवारी (ता. 5) रात्रीच्या सुमारास घडली . गोपीचंद दादा गवळी राहणार (रा. अंकोली ता. मोहोळ ) हे शुक्रवारी सायंकाळी पंढरपूर येथून आपल्या पत्नीसोबत दुचाकीवरून आपल्या गावाकडे निघाले होते.
देगाव जवळ दुचाकी उभी करून ते लघुशंकेसाठी गेले होते . त्यावेळी अचानक दोघांवर त्यापैकी एकाने गोपीचंद यांच्यावर चाकू हल्ला केला .आणि त्यांना धमकी देऊन पत्नीच्या अंगावरील मंगळसूत्र आणि कानातील दागिने असा एकूण 40 हजाराचा ऐवज लुटून पोबारा केला. या घटनेची फिर्याद गोपीचंद गवळी यांनी पंढरपूर तालुका पोलिसात दाखल केली .सहाय्यक निरीक्षक ओलेकर पुढील तपास करीत आहेत.