मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच जेलमध्ये घरुन जेवण मागवण्याची परवानगी मिळावी, ही देशमुखांची विनंती कोर्टाने फेटाळली आहे. तुम्ही आधी जेलमधील जेवण घ्या, जर ते तुम्हाला योग्य वाटले नाही, तर मग तुमच्या विनंतीवर विचार करु, असे कोर्टाने देशमुख यांना म्हटले.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कोठडी संपली असून त्यांना सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये घरचे जेवण देण्यासाठी देशमुखांकडून न्यायालयात मागणी केली होती.
देशमुख यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी न्यायालयाला विनंती केली की, देशमुख यांचे वय व त्यांना असलेल्या आजारांचा विचार करता ते कारागृहात जमिनीवर झोपू शकत नाहीत. त्यांना बेड व औषधे देण्याची तसेच घरचे जेवण देण्याची परवानगी द्यावी. त्यावर न्यायालयाने देशमुख यांना बेड व कारागृहातील डॉक्टरांना दाखवून औषधे नेण्याची परवानगी दिली.
मात्र ही मागणी फेटाळली असून न्यायालयाने तुरुंगातील जेवण घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे न्यायालयाने अनिल देशमुखांना चांगलाच दणका दिला आहे. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना शंभर कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्याप्रकरणी आणि गैरव्यवहार केल्यामुळे अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 1 नोव्हेंबर रोजी ईडीने अटक केली आहे. देशमुख ईडीच्या चौकशीसाठी हजर राहिले होते यावेळी 12 तासांच्या चौकशीनंतर देशमुख यांना अटक करण्यात आली. ईडी कोठडीमध्ये देशमुखांना घरचे जेवण देण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र देशमुखांची ईडी कोठडी सोमवारी संपली. त्यामुळे न्यायालयाने त्यांना आता न्यायालयीन कोठडी दिली आहे.
अनिल देशमुखांना न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्यांच्या वकिलांनी न्यायालयात तब्येतीबाबत कारण सांगत त्यांना घरचे जेवण देण्याची परवानगी देण्याची मागणी केली. न्यायालयाने सुनावणीदरम्यान देशमुखांची मागणी फेटाळून लावली आहे. तसेच आधी तुरुंगातील जेवण घ्या, जर तुम्हाला योग्य नाही वाटलं तर विचार करु, असे उत्तर न्यायालयाने दिलं आहे. न्यायालयाने मागणी फेटाळल्यामुळे आता देशमुख यांना पुढील काही दिवस तुरुंगातील जेवण घ्यावे लागणार आहे. मात्र त्यांना एक वेगळा बेड देण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे.
* आधी पैसे भरा; मग वीज वापरा- ठाकरे सरकार निर्णयाच्या तयारीत
एकीकडे राज्यातील शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी जोर धरती आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक माहिती दिली आहे. भविष्यात आधी पैसे भरावे लागेल मग वीज वापरता येणार असल्याची शक्यता आहे. ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत असल्याचे संकेत पवारांनी दिली. दरम्यान, नागरिकांना याआधी वाढून आलेले बिलही ठाकरे सरकारने कमी केले नाहीत.