अक्कलकोट : सोलापूर – अक्कलकोट रोडवरील कुंभारी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपचा आज मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. यात पाचजण जागीच ठार तर एकाच प्रकृती चिंताजनक तर सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. एसटीचा संप असल्याने खासगी वाहनातून प्रवासी कोंबून भरुन नेण्याच्या प्रकारामुळे हा प्रकार घडला आहे. या जीपमध्ये एकून 25 प्रवाशी प्रवास करत असल्याचे वृत्त आहे.
वळसंग पोलीस ठाणेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात अंदाजे पाच जण जागीच ठार झाले आहेत. ठार झालेल्या पैकी ३ पुरुष व २ महिलांच्या समावेश असून,ठार झालेल्या पैकी अक्कलकोट तालुक्यातील बागेहळ्ळीचे ३ जणांचा समावेश असून, यात कटेव्वा यलप्पा बनसोडे (वय-५५,रा.बागेहळ्ळी), त्यांचा मुलगा बसवराज यलप्पा बनसोडे ( वय- ४२, रा.बागेहळ्ळी),व कटेव्वाचे भाऊचा मुलगा आनंद इरप्पा गायकवाड ( वय- २५, रा.बागेहळ्ळी) व लक्ष्मण मुरलीधर शिंदे ( वय- ४२,रा. बणजगोळ, ता.अक्कलकोट ) व एक अनोळखी महिला अंदाजे वय- ३५ असे एकूण पाच जणांचा समावेश आहे. जागीच ठार झालेल्या जवळपास ३० वयाच्या पुढील आहेत.
जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर रुग्णवाहिकाही त्वरित उपलब्ध झाली नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आम्ही जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असे रुग्णालयात बाबा मिस्त्री यांनी माध्यमांना सांगित.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अक्कलकोटहून सोलापूरकडे येणाऱ्या (MH-13 AX-1237) जीपचे पुढील टायर फुटल्याने सोलापूर – अक्कलकोट रोडवर पंपासमोर गाडी पलटी झाली. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर, अक्कलकोट व गाणगापूर असा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश आहे. अक्कलकोटहून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन सोलापूरकडे जात असताना हा अपघात झाला.
एकूण बारा प्रवाशांपैकी सहा जण किरकोळ जखमी, एकाच प्रकृती चिंताजनक व पाच जणांचा जागीच मृत्यू झाले आहेत. सध्या एसटी बस बंद असल्याने नागरीक मिळेल त्या वाहनांनी प्रवास करत आहेत. त्यामुळे खासगी तसेच अवैध प्रवासी वाहतूक वाढली आहे. एका वाहनात बारा प्रवासी कोंबले. त्यामुळेच वाहनाचे टायर फुटून हा अपघात झाला आहे. एसटीचा संप 19 दिवस होऊनही मिटत नसल्याने नागरिकांनाही असा धोक्याचा प्रवास करावा लागत आहे. जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे प्रवासाचा सर्व भार हा खासगी वाहनांवर आला आहे. राज्यभरात खासगी वाहतूकीद्वारे प्रवाशी सेवा सुरु आहे. मात्र या खासगी वाहनांतून बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे चित्र आहे. प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशी एकाच वाहनांतून प्रवास करताना अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे अशा अपघाताच्या घटना समोर येत आहेत.