बार्शी : येथील नूतनीकरण केलेल्या भगवंत मैदानाच्या लोकार्पण कार्यक्रमास येत असताना आ. राजेंद्र राऊत यांच्या अंगावर रसायन टाकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल प्रहार अपंग संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संजीवनी बारंगुळे यांच्यासह बालाजी डोईफोडे, ओमकार पिंपळे, सतीश बारंगुळे व इतर दोन अनोळखी इसमांविरोधात शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत आ. राऊत यांचे खाजगी स्विय सहाय्यक प्रशांत चंद्रकांत खराडे यांनी फिर्याद दिली आहे. तसेच याप्रकरणात सहभागी संशयित अरोपी बालाजी डोईफोडे यांनी आपणांस आ. राऊत यांनी नगरपालिकेत बोलावले आहे असे सांगितल्यानंतर आपण तेथे गेल्यानंतर नगरसेवक पाचू उघडे, नगरसेवक दिपक राऊत यांचे बंधू सतिश राऊत व अन्य पाच ते सहा अनोळखी इसमांनी लाथा-बुक्क्याने मारहाण केल्याची फिर्याद दिल्यावरुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरणाची शहरात उलटसुलट चर्चा रंगली आहे.
याबाबत खराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी दुपारी 4 वा. भगवंत मैदानाच्या नूतनीकरण कार्यक्रमासाठी ते आ. राऊत यांच्यासमवेत कार्यक्रम स्थळाकडे निघाले असता गेट नं. 1 च्या समोर संजीवनी बारंगुळे, बालाजी डोईफोडे, ओमकार पिंपळे, सतिश बारंगुळे व इतर दोन अनोळखी इसम यांनी त्यांना अडवले. तुम्ही आमचे नेते राजेंद्र मिरगणे यांच्या बांधकाम प्रकल्पाबाबत तक्रारी का करता, असे म्हणून संजीवनी बारंगुळे यांनी तिच्याजवळील बाटलीचे झाकण उघडून कसले तरी केमिकल त्यांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांना धरुन बाजूला करताना बाटली जमिनीवर पडून त्यातील द्रव सांडले.
यावेळी त्यांच्यासमवेत असलेल्यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी जवळच असलेले संदेश काकडे, दिपक राऊत, पाचू उघडे, अमोल चव्हाण व इतर लोक जवळ येत असल्याचे पाहून आरोपी पळून जावू लागले. त्यावेळी ओमकार पिंपळे याला संदेश काकडे व दिपक राऊत यांनी पाठलाग करुन पकडले. त्यावेळी त्याच्या खिशात असलेल्या मोबाईलवर फोन आला. तो फोन दिपक राऊत यांनी उचलला. समोरुन मी राजेंद्र मिरगणे बोलतोय, तुम्ही अजून राजा राऊताच्या अंगावर ऍसिड टाकले का नाही, अशी विचारणा केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यावरुन वरील प्रकार हा राजेंद्र मिरगणे यांचे सांगण्यावरुन घडला असून आ. राऊत यांनी मिरगणे यांच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत तक्रारी केल्यामुळे चिडून जावून राजेंद्र मिरगणे यांनी आ. राऊत यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यासाठी संजीवनी बारंगुळे व इतरांना सुपारी दिली आहे, अशी खात्री झाली, असे म्हटले आहे.
बालाजी डोईफोडे यांच्या फिर्यादीनुसार, ते दुपारी 3.50 वा. सुमारास घरी असताना सतिश राऊत व अनोळखी तिघेजण त्यांच्या घरी आले. व त्यांनी तुम्हांला आमदारसाहेबांनी नगरपालिकेमध्ये बोलाविले आहे, असे सांगितले. त्यामुळे ते त्यांच्यासोबत नगरपालिकेमध्ये गेले. तेथे नगरसेवक पाचू उघडे यांनी काटकर यास फोन लाव व त्यास नगरपालिकेत बोलावून घे, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी काटकर याला फोन करुन सांगितले. त्यानंतर तेथे पवारसर आले व येथून तुम्ही बाहेर चला असे म्हणून नगरपालिकेच्या गेटवर आले.
नंतर तेथे उभे असलेले पाचू उघडे, सतिश राऊत व अनोळखी पाच ते सहा जणांनी त्यांना काही न बोलता लाथाबुक्क्यांनी मारहाण करणेस सुरुवात केली. त्यावेळी रमेश पाटील, विश्वासभाऊ बारबोले, पवार सर तसेच तेथे बंदोबस्तासाठी आलेले पोलिस कर्मचारी यांनी त्यांना सोडविले, असे फिर्यादीत म्हटले आहे.