सोलापूर : ‘जो बोले सो निहाल, सत श्री अकाल….’ ‘श्री वाहे गुरुजी का खालसा, श्री वाहे गुरुजी की फतेह ‘ च्या जयघोषात आज शुक्रवारी सोलापुरात शीख पंथाचे संस्थापक व पहिले गुरु श्री गुरूनानकजी यांची जयंती उत्साहात साजरी झाली. श्री गुरू ग्रंथसाहिबजी या धर्मग्रंथाची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
सोलापूर सिंधी सेंट्रल पंचायततर्फे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात श्री गुरुनानक जयंती दिनी पहाटे ४.३० वाजता अमृतवेला ट्रस्टचे संस्थापक भाई गुरूप्रीत सिंगजी उर्फ रिंकू भाईसाबजी यांचे उल्हासनगर येथे होणारे प्रवचन गुरुनानक हॉलमध्ये लाईव्ह दाखवण्यात आले. यानंतर सकाळी ६.३० वाजता श्री गुरुग्रंथ साहिबजीचे स्वरूप असलेल्या सुखमणीसाहिब आणि जप साहिब यांच्या अखंड पाठाची समाप्ती झाली. यानंतर सकाळी ७ वाजता गुरुग्रंथ साहिब या पवित्र धर्मग्रंथांची पालखी मिरवणूक गुरुनानक नगर परिसरातून काढण्यात आली.
या मिरवणुकीच्या अग्रभागी पारंपरिक पोशाख परिधान करून शस्त्र आणि ध्वज घेतलेले तरुण होते. यामागे सजवलेल्या पालखीत पवित्र ग्रंथ श्री गुरु ग्रंथसाहिबजी ठेवण्यात आला होता. मिरवणूक मार्गावर पालखीसमोर सिंधी समाजातील महिला भगिनींनी रस्त्यावर स्वच्छता केली. या पालखी मिरवणूकीचे नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘सतनाम वाहे गुरु सत नाम..’ चा अखंड जप मिरवणुकीत सुरू होता. श्री गुरुनानक हॉल येथून सुरु झालेली ही पालखी मिरवणूक उजनी नगर वसाहत, कृष्णा सोसायटी, नवजीवन नगरमार्गे जाऊन श्री गुरूनानक नगर येथे समरोप झाला.
यानंतर दिवसभर गुरुनानक हॉल येथे सोलापूर सिंधी सेंट्रल पंचायत, राऊंड टेबल इंडिया आणि अश्विनी ग्रामीण रुग्णालय यांच्यातर्फे रक्तदान शिबिर, अवयव दान अर्ज भरण्याचे शिबिर, नेत्रदान अर्ज भरण्याचे शिबिर, मोफत लसीकरण तसेच आरोग्य तपासणी शिबिर झाले. तसेच शहरातील तब्बल दोन हजार गरजूंना नानकरोटी लंगर महाप्रसाद देण्यात आला.
श्री गुरुग्रंथ साहिबजी या पवित्र ग्रंथाच्या पाठाची समाप्ती, लंगर महाप्रसाद, उल्हास नगर येथील जयंतीनिमित्त होणाऱ्या किर्तन दरबाराच्या विशेष कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आदी कार्यक्रम उत्साहात झाले.
कार्यक्रमांना पोलिस आयुक्त हरिष बैजल, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीप माने, महापौर श्रीकांचना यन्नम, महापालिकेतील सभागृह नेते शिवानंद पाटील, उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा सरकारी वकील ऍड. प्रदीपसिंग राजपूत, नगरसेवक नागेश वल्याळ, संतोष भोसले, सुधीर खरटमल, माजी खासदार धर्मण्णा सादुल, केतन व्होरा, माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया आदींनी भेट देऊन प्रार्थना केली.
यावेळी सोलापूर सिंधी सेंट्रल पंचायतचे हरिष कुकरेजा, मोहन सचदेव, शंकरलाल होतवानी, राजकुमार पंजवाणी, लालचंद वाधवानी, इंदरलाल होतवानी, योगेश रावलानी, राजू धमेचा, हरेश नानकानी, धनराज आनंदानी, नारायण आनंदानी, जेठानंद बहिरवानी आदी उपस्थित होते.