नाशिक : राज्यात एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. नाशिकच्या पेठ आगारातील ही घटना आहे.
चालक गहिनीनाथ गायकवाड असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते मूळचे बीड येथील रहिवासी आहेत. कमी पगार आणि कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिकमध्ये आंदोलनामुळे जिल्ह्यातील 13 डेपोंची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करावे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
आंदोलनावर राज्य सरकारडून कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे या आंदोलनावर तोडगा निघाला नाही म्हणून एसटीचं खासगीकरण होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. पण या चर्चेमुळे आणि मागण्या मान्य न झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गहिनाथ गायकवाड यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे काही सहकारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली. “हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. ते आणखी किती कर्मचाऱ्यांचा बळी घेणार?”, असा सवाल उपस्थित केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल न घेणाऱ्या या सरकारचा आपण निषेध करत असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान, कालच बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आगारातील सहाय्यक तांत्रिक विशाल अंबलकर यांनी विष घेत आत्महत्या केली होती. सरकारने कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली आहे. आपलंही निलंबन होईल या भीतीने अंबलकर यांनी विष प्राशन केलं होतं. आज दुस-या कर्मचा-याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.