सोलापूर : शाळेमध्ये वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी देण्याकरिता एक लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. ही कारवाई बसस्थानकानजीक पेट्रोलपंपाजवळ झाली.
विजयसिंह गणपती पुजारी (वय ५६ वर्षे, रा. जवाहर ग्रामविकास मंडळ, वाळूज ता. मोहोळ जि. सोलापूर ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ते जवाहर ग्रामविकास मंडळ वाळूज (ता. मोहोळ) या संस्थेच्या वाळूज प्रशालेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. तर या संस्थेचे सचिव श्याम ऊर्फ रोहित जनार्दन कादे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदाराच्या वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी मिळण्याकरिता संस्थेमध्ये विनंती अर्ज केला होता.
परंतु संस्थेने त्या अर्जावर कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले होते. या रिट पिटीशन अर्जावर न्यायालयात तक्रारदाराच्या बाजूने म्हणणे मांडून त्यांना अनुकंपा तत्त्वावर संस्थेमध्ये नोकरी देण्याकरिता दोन्ही आरोपींनी तक्रारदाराकडे १४ लाख रुपये व सेवेत सामावून घेतल्यानंतर प्रत्येक वर्षी एक महिन्याचा पगार अशी लाचेची मागणी केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यास अनुसरून तक्रारदारांनी १४ लाख रुपयांपैकी नऊ लाख रुपये पहिला हप्ता म्हणून नोकरीमध्ये रुजू होण्यापूर्वी आरोपींना दिला होता. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयानुसार तसेच तक्रारदारांच्या विनंतीनुसार अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात आली.
नंतर मुख्याध्यापकांनी उर्वरित पाच लाख रुपये संस्थेच्या सचिवांना देण्याकरिता तक्रारदाराकडे तगादा लावला होता व ती रक्कम येऊन भेटण्याकरिता तक्रारदारास बोलावले होते. दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदविल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार पाच लाख रुपयांपैकी पहिला हप्ता एक लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्यानुसार एक लाख रुपये स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्याध्यापक पुजारी यास अटक केली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार चडचणकर, सोनवणे, घुगे, घाडगे, जानराव पवार, सन्नके, मुल्ला, सुरवसे यांनी केली.
अटक केलेल्या मुख्याध्यापक पुजारी यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. यात सरकारतर्फे ॲड. प्रकाश जन्नू तर आरोपीतर्फे ॲड. अभिजित इटकर, ॲड. पांडुरंग काळोखे हे काम पाहत आहेत.