मागच्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहे. भारतीय क्रिकेटमधील महत्वाच्या पदांवर काही नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विराट कोहलीने टी २० संघाचे नेतृत्व सोडल्यावर त्याची जागी रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आली. रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपल्यावर त्यांच्या जागी राहुल द्रविड यांची नियुक्ती करण्यात आली.
राहुल द्रविड यांची भारताचे मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यावर महत्वाच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या ( एनसीए ) प्रमुखपदी कोणाची नियुक्ती होणार असा प्रश्न क्रिकेट विश्वातून विचारला जात होता. आता या प्रश्नाचेही उत्तर मिळाले असून भारताचे माजी फलंदाज ‘वेरी वेरी स्पेशल’ म्हणजेच व्ही व्ही एस लक्ष्मण हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे नवे प्रमुख असतील अशी घोषणा बीसीसीआयने केली आहे.
लक्ष्मण यांची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी झालेली निवड सर्वार्थाने योग्य आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत देशभरातील गुणवान युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात येते. त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे बारकावे शिकवण्यात येतात. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतच क्रिकेटचे धडे गिरवणारे खेळाडूच पुढे जाऊन देशाचे प्रतिनिधित्व करतात. आता भारतीय संघाचे सदस्य असणारे सर्व खेळाडू हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतच तयार झालेले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काही वर्षांपासून या अकादमीची धुरा राहुल द्रविड सांभाळीत होते. आता लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची धुरा सांभाळतील. लक्ष्मण यांचा अनुभव युवा खेळाडूंसाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे. खेळाडू म्हणून लक्ष्मण यांनी देशासाठी मोठी कामगीरी केली आहे आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून देशसेवा करण्याची संधी त्यांना पुन्हा एकदा मिळाली आहे या संधीचे सोने करतील यात शंका नाही.
लक्ष्मण यांची क्रिकेट कारकीर्द खूप गाजली. लक्ष्मण यांनी १९९६ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय कसोटीत पदार्पण केले तर वन डेत झिम्बाब्वेबरोबर १९९८ साली पहिला सामना खेळला. त्यांनी १३४ कसोटीत ८७८१ धावा करताना १७ शतके ठोकली होती. तर ८६ वन डेत सहा शतकांसह २३३८ धावा काढल्या. २००१ साली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीत लक्ष्मण यांनी २८१ धावांची विक्रमी खेळी केली होती. लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध २९ कसोटी सामने खेळत २४३४ धावा केल्या होत्या. तर २१ वनडेत ७३९ धावा केल्या. त्यांची कसोटीतील १७ शातकांपैकी ६ आणि वनडेतील ६ पैकी ४ शतके ऑस्ट्रेलिया विरुद्धच आहे. आपल्या कारकिर्दीत एक यशस्वी फलंदाज म्हणून नावाजलेल्या लक्ष्मण यांनी आपल्या अप्रतिम फलंदाजीने देशाला अनेकदा अविश्वसनीय विजय मिळवून दिले आहेत. निवृत्ती नंतर समालोचक म्हणून त्यांची कारकीर्दही गाजली तसेच आयपीएलमधील हैद्राबाद सनरायजर्स या संघाला त्यांनी मार्गदर्शन केले.
आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून आता त्यांना हैदराबादच्या मार्गदर्शक पदावर पाणी सोडावे लागेल तसेच समालोचनही करता येणार नाही यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. देशासाठी आर्थिक नुकसान सहन करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. बीसीसीआयने आता त्यांच्यावर देशातील युवा खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांना वरिष्ठ संघासाठी तयार करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. ही जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास क्रिकेट रसिकांना आहे. त्यांच्या हाती भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी नियुक्त झालेल्या लक्ष्मण यांचे मनापासून अभिनंदन व शुभेच्छा!
* श्याम ठाणेदार, पुणे