सोलापूर : राज्यभर सोयाबीनची आवक मंदावल्याने सोयाबीन आता भाव खाणार आहे. भाव वाढून 6 हजाराच्या पुढे सरकला आहे. मात्र यामुळे शेतकरी नाही तर आता स्टॉककर्ते व्यापारीच मालामाल होणार आहेत.
दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतरही राज्यांतील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची 30 ते 50 हजार क्विंटलच्या आसपास आयात सुरू झाली होती. मात्र ऑगस्ट-सप्टेंबरचा दर या शेतकरी बांधवांना मिळत नसल्याने अनेकांनी गेल्या महिन्यापासून घरातच सोयाबीन साठवण करून ठेवले मात्र दर वाढतच नसल्याने नाईलाजाने अनेक शेतकरी बांधवांनी आपले सोयाबीन कमी भावातही बाजार समित्यांमध्ये आणून विकले.
आता राज्यातील विविध बाजार समित्यांत सोयाबीनची आवक मंदावू लागल्याचे चित्र आहे. यामुळे आता सोयाबीन दर वाढण्याची शक्यता जाणकार शेतकरी बांधवांनी व्यक्त केली असून, राज्यातील ज्या व्यापार्यांनी कमी भाव असताना सोयाबीन खरेदी करून स्टॉक करून ठेवले आहे; असे ते व्यापारी अल्पावधीतच (महिनाभरात) मालामाल होणार असल्याचीही माहितीही मिळाली.
दरम्यान, दिवाळीच्या पूर्वी आणि सध्याही 5 ते 6 हजाराच्या मागे-पुढेच दर बळीराजाला मिळाला मात्र आगामी काळात हा दर 8 ते 11 हजाराच्या आसपास जाण्याची शक्यता नाकारता येत नाही; कारण तेलाच्या किंमती कमी होण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढतच आहेत.
खरिपातील 3 ते साडेतीन महिन्यात निघणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते…सोयाबीनची जात तशी टणकच असते…अतिवृष्टी वगळता…मोठ्या पावसात जरी हे पीक सापडले तरी तसे फार मोठे नुकसान होत नाही…यंदा राज्याच्या काही भागात अतिवृष्टी झाल्याने या पिकाचे मोठे नुकसान झाले असले तरीही ज्या ठिकाणी मोजका पाऊस झाला अशा भागात या पिकाला उताराही चांगला पडला आहे. यामुळे ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच या उत्पन्नाची भरलेली पोती बाजापेठांत दाखलही झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पीक निघण्यापूर्वीचा सोयाबीनचा दर अनेक ठिकाणी 10 हजाराच्या पुढे गेला असल्याने सुरूवातीला उत्पन्न घेणार्या शेतकर्यांना हाच भाव टिकून राहील, अशी अपेक्षा वाटत होती. मात्र सोयाबीन बाजारात जाण्यापूर्वीच राज्यातील चतूर व्यापारी अन् राजकीय नेत्यांनी हातमिळवणी करून हा दर 5 हजाराच्या घरात आणून ठेवला. कर्जाच्या ओझ्याने वाकलेल्या शेतकर्यांना लोकांची देणी-घेणी सारायची असतात…रब्बी हंगामातील बि-बियाणांची सांगड लावायची असते…म्हणून आहे त्या भावात शेतकर्यांनी आपले सोयाबीन घातले.
ज्या शेतकर्यांकडे दाम शिल्लक आहे…अशाच मोजक्या शेतकर्यांनी आपले सोयाबीन घरात पोत्यांची तोंडं लावून ठेवले होते. त्यातीलही बहुतांश शेतकर्यांनी दिवाळीनंतर सोयाबीन विकायचा सपाटा लावल्याने राज्यातील अवघ्या 2 ते 3 टक्के शेतकर्यांकडेच सोयाबीन घरात साठवून ठेवले असण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांत 14 नोव्हेंबर रोजी 10 हजार क्विंटलपर्यंत आणि आज दि. 19 रोजी अवघे 20 हजार क्विंटल सोयाबीन आयात झाले आहे.
सध्या तेलाच्या किंमती व सोयाबीनपासून निर्माण होणार्या विविध खाद्य पदार्थांच्या किंमती चढ्याच दराने असल्याने भविष्यात सोयाबीनचा भाव पुन्हा वाढण्याची शक्यता राज्यातील कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
बाजार समित्यात शुक्रवारी (ता. 19) अशी झाली आवक (आकडे क्विंटलमध्ये) 35 च्या घरात मोठ्या बाजार समित्या असलेल्या आपल्या राज्यातील अवघ्या 9 बाजार समित्यांमध्ये खालीलप्रमाणे सोयाबीन आयात झाले. अहमदनगर-93, अकोला-3 हजार 441, औरंगाबाद-90, हिंगोली-800, लातूर-14 हजार 328, नागपूर-124, नांदेड-353, सोलापूर-138, यवतमाळ-850 अशी 20 हजार 217 इतकी अल्प आवक झाली. तर याचे आजचे दर कमीत-कमी 5 हजार 300 ते जास्तीत जास्त 6 हजार 126 इतके दर होते. गेल्या 10 ते 15 राज्यातील विविध बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनची मोठी आवक झाली होती. दि. 14 तारखेलाही आवक मंदावल्याचे चित्र होते मात्र 15 ते 18 पर्यंत मोठ्या प्रमाणात म्हणजेच 30 ते 50 हजार क्विंटलपर्यंत सोयाबीन बाजारात आले होते. आता मात्र आवक मंदावू लागल्याचे चित्र दिसत आहे.