मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय पातळीवरील काही महत्त्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील भाजपचे नेते विनोद तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदाची धुरा देण्यात आली आहे. भाजपच्या नव्या राष्ट्रीय समितीची आज, रविवारी घोषणा झाली आहे.
यासोबत दोन राष्ट्रीय प्रवक्ते आणि दोन नवे सरचिटणीसही जाहीर करण्यात आले आहेत. विनोद तावडे आता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून तावडे हरियाणाचे प्रभारी म्हणून काम पाहत होते. राष्ट्रीय चिटणीस पदावरून तावडे यांची आता राष्ट्रीय सरचिटणीस पदावर पदोन्नती झाली आहे.
पंतप्रधानांच्या मन की बातचे समन्वयक, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे ही समन्वयक झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी रविवारी परिपत्रक काढून यासंदर्भात घोषणा केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातून दूर असलेले तावडे आता राष्ट्रीय राजकारणात, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
2019 मध्ये विधानसभेला तिकीट नाकारलेल्या दोन मोठ्या नेत्याचं एकापाठोपाठ पुनर्वसन करण्याचा भाजपनं प्रयत्न केलाय. काल शनिवारी चंद्रशेखर बावनकुळेंना विधानपरिषद तिकीट दिलं आहे. तर आज विनोद तावडेंना राष्ट्रीय सरचिटणीसपदावर पदोन्नती दिली आहे.
फडणवीस सरकारमध्ये विनोद तावडे विधानपरिषदेवर निवडून गेले होते. फडणवीस सरकारमध्ये तावडे यांनी शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी पार पाडली होती. मात्र, 2019 च्या निवडणुकीत तावडेंना तिकिट नाकारले होते. त्यामुळे तावडे नाराज होते. पण आता त्यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विनोद तावडेंने याआधी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, भाजपच्या महाराष्ट्र युनिटचे सरचिटणीस, मुंबई भाजप अध्यक्ष आणि 12 व्या आणि 13 व्या लोकसभा निवडणुकीसाठी समन्वय समितीचे प्रमुख सदस्यपद भूषवलं आहे.
भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी रविवारी परिपत्रक काढून ही घोषणा केली. यामध्ये पाच जणांना मोठी जबाबदारी दिली. यामध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे यांचं नाव आहे. तर झारखंडच्या आशा लकड़ा आणि बिहारचे ऋृतुराज सिन्हा यांनाही जबाबदारी दिली आहे. त्याशिवाय पश्चिम बंगालच्या भारती घोष आणि शहजाद पूनावाला यांना राष्ट्रीय प्रवक्ता करण्यात आलेय.
भाजपने एकनाथ खडसे यांना देखील उमेदवारी नाकारली होती. मात्र ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा विषय राहत नाही. मात्र त्याचवेळी भाजपच्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न शिल्लक राहतो. याआधी त्यांना विधान परिषद देणार अशी चर्चा होती. मात्र ऐनवेळी पंकजा यांचं नाव वगळण्यात आलं. आता त्यांचंही पुनर्वसन होणार का, हे पाहणं औत्सुक्याच ठरणार होते.
भाजपमध्ये पुनर्वसनाचे वारे सुरू असताना पंकजा मुंडे यांनी आपली खदखद आज पुन्हा एकदा व्यक्त केली. एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईल, पण कुणासमोर हात पसरवून कुठल्या पदाची मागणी करण्याची माझी संस्कृती नाही’ असं पंकजा यांनी एका सभेत ठणकावून सांगितले.