नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी 29 नोव्हेंबरला ट्रॅक्टर मार्चची घोषणा केली आहे. यामध्ये 60 ट्रॅक्टर सामील होणार आहेत. जे मार्ग खुले झाले आहेत, त्या मार्गाने हे ट्रॅक्टर जाणार आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांनी एमएसपी कायदा आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करुनही शेतकरी संघटना त्यांच्या ‘चलो दिल्ली’ कार्यक्रमावर ठाम आहेत. 26 नोव्हेंबर रोजी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने शेतकर्यांना एकत्र येण्यास सांगण्यात येत आहे, जेणेकरून 29 नोव्हेंबर रोजी संसदेकडे निघणार्या ट्रॅक्टर ट्रॉली मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होऊ शकतील.
शेतकरी संघटनांच्या या आवाहनानंतर मोठ्या संख्येने शेतकरी राजधानीच्या सीमेवर पोहोचू लागले आहेत. पंजाबमध्ये, दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी विविध कृषी संघटनांकडून बैठका घेतल्या जात आहेत. सिंघू, टिकरी सीमा आणि बहादूरगड येथे मोठ्या संख्येने शेतकरी येण्याची शक्यता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जोपर्यंत हे कायदे संसदेत औपचारिकपणे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन संपवून मागे हटणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 26 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा ओघ सुरूच राहणार आहे.
भारतीय किसान युनियनने मोठ्या संख्येने शेतकरी येण्याचा दावा केला आहे. त्यासाठी मोठा मंडपही टाकला जातोय. संस्थेचे सचिव शिंगारा सिंग म्हणाले, 10 एकरपेक्षा जास्त मोठी खुली जागेत हा मंडप टाकला जात आहे. या ठिकाणी हे सर्वशेतकरी एकत्र जमतील. तसेच, आंदोलनाच्या जुन्या जागेवर उभारण्यात आलेल्या शेडचा उपयोग शेतकऱ्यांना रात्री झोपण्यासाठी केला जाणार आहे. 26 नोव्हेंबरला येथे एक लाखाहून अधिक लोक पोहोचतील, अशी आमची अपेक्षा आहे.
आगामी हिवाळी अधिवेशनात संसदेकडे प्रस्तावित ट्रॅक्टर मोर्चाबाबत शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, 29 नोव्हेंबर रोजी शेतकरी संसदेपर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. शेतकरी संघटनांची संघटना असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 500 शेतकरी संसदेत पोहोचतील. सरकारने खुले केलेल्या रस्त्यावरुन शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचे टिकैत यांनी म्हटले आहे. रस्ता रोको करण्याचा आपला हेतू नसून सरकारशी चर्चा करण्याचा आहे, असेही म्हणाले.