सोलापूर : येथील सवेरा नगर विजापूर रोड परिसरात राहात असलेल्या – पोलीस निरीक्षकाच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारून तब्बल ७० हजाराचे सोन्याचे दागिने आणि २ लाख ३० हजाराच्या रोकडसह ३ लाखाचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवार ( दि. २६) नोव्हेंबर रोजी घडली.
विकमसिंह देवेंद्र गिड्डे (वय ३५, रा. १०१, सवेरा नगर, सैफुल विजापूर रोड सोलापूर) यांनी फिर्यादी दिली. सध्या शहर आणि परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून बंद घर दिसले की ते फोडण्याचेच प्रकार वाढत आहेत. त्यात आता एका पोलीस निरीक्षकांचेच बंद घर फोडून चोरट्यांनी पोलीस खात्यासमोर आव्हानच उभे केले आहे.
शहर पोलीस दलातील विशेष शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर हे सैफुल येथील सवेरानगरात राहतात. ते, त्यांची पत्नी व अन्य नातेवाईक विवाह कार्याकरिता विजयपूर येथे गेले होते. त्यांचे घर बंद असल्याची
संधी साधून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील दोन लाख ३० हजारांची रोकड, ७० हजारांचे दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र असा तीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. शनिवारी सकाळी घरफोडी झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत विक्रमसिंह देवेंद्र गिड्डे (वय ३५, रा. सवेरानगर) यांनी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार म्हेत्रे हे करीत आहेत.
सोलापूर शहर परिसरात गेल्या महिनाभरापासून चोऱ्याचे प्रमाणात वाढ झालेली आहे. चोरट्यांनी नागरीकांची घरे फोडणे, दुकान फोडणे, मंगळसुत्र हिसकावणे, घरातील मोबाईल चोरणे असे प्रकार करून हैदोस माजवला आहे.
त्यातच नुकतेच मागील आठवड्यात एका महिला पोलीसाची मोपेड चोरट्यांनी चोरून नेली त्यानंतर आता थेट पोलीस निरीक्षकाच्या घरातच डल्ला मारून मोठा ऐवज चोरून नेला. त्यामुळे चोरट्यांनी आता पोलीसांना थेट आव्हान दिले आहे. परंतु पोलिसांनी गेल्या महिनाभरात एकही चोरी उघडकीस आणली नाही याचे सर्वसामान्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीसांच्या घरात चोऱ्या होत असतानातरी पोलीस चोरट्यांना जेरबंद करतील का, असेही प्रश्न नागरीक विचारत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* अपघातात चार महिला वारक-याचा मृत्यू
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप शिरल्याने मोठा अपघात झाला. यात ४ महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर जवळपास २४ वारकरी जखमी झाले.
ही घटना शनिवारी (ता. २७ ) सकाळी ७ च्या सुमारास कान्हेफाटा येथे घडली. यानंतर पिकअप चालकाला वडगाव मावळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जयश्री आत्माराम पवार (वय ५४, रा. कर्जत, भूतीवली), सविता वाळकू यरम (वय ५८, रा. खालापूर, उंबरे) आणि विमल चोरगे (वय ५०, रा.खालापूर), संगीता वसंत शिंदे (वय ५६, रा. कर्जत ता. खालापूर) या चार महिलांचा मृत्यू झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
* मयूरवन हॉटेलमध्ये तोडफोड, व्यवस्थापकाला मारहाण
सोलापूर : जुळे सोलापुरातील हॉटेल मयूरवन येथे दारू पिण्यास दिली नाही म्हणून हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करून व्यवस्थापकाला मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता घडली.
या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापक गणेश भाऊसाहेब आतकरे (वय २८, रा. देगाव, ता. मोहोळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महादेव राम भंडारे, महेश श्रीमंत कंपल्ली (दोघे रा. मोदीखाना) व त्याचे इतर पाच अनोळखी साथीदार अशा सातजणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी फिर्यादीच्या हॉटेलमध्ये मद्यपान करून हॉटेल बंद करण्याच्या वेळी दारू मागितली. फिर्यादीने त्यांना हॉटेल बंद करण्याची वेळ झाली आहे असे सांगितले असता आरोपींनी हॉटेलमधील काउंटरमध्ये घुसून खिशातून चाकू काढून आम्हास दारू पिण्यास नाही दिली तर मारून टाकेन, अशी दमदाटी केली व दुसऱ्याने दारूच्या बाटल्या घेऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून व्यवस्थापकाला मारहाण केली.
तसेच हॉटेलमधील टेबल, बाटल्या, फ्रिज अशा साहित्याची तोडफोड करून नुकसान केले आहे. अधिक तपास पोलीस नाईक सोनार हे करीत आहेत.