सोलापूर : भाजपचे जबाबदार दोन नगरसेवक उघडपणे एकमेकांवर अर्वाच्च आरोप करीत आहेत. शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपची सातत्याने अब्रू चव्हाट्यावर येत आहे. सत्तेच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात भाजपमधील पक्षातर्गंत वाद सातत्याने जनतेसमोर आलेले आहेत. आता आगामी काळात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने अशी अब्रू चव्हाट्यावर येणे भाजपला परवडणारे नाही. म्हणून आता भाजप वरिष्ठांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.
सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे हे भाजपाचे जेष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर सभागृहात गैरवर्तन केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत आज काळीफित लावून पालिकेत वावरत आहेत.
सोलापूर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सभेत भाजपाचे जेष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी पाण्याची बाटली महापौरांच्या मंचाच्या दिशेनं भिरकावली. नगरसचिवांवर त्यांचा रोष होता. महापौरांनी या प्रकरणी त्यांच्याबर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. पण महापौरांनी ती कारवाई केली नाही. पालिका आयुक्तांनी सभागृहातील बेशिस्त बर्तनप्रकरणी सुरेश पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी भुमिका राजेश काळे यांची आहे.
सुरेश पाटील यांनी राजेश काळे यांच्या मागणीनंतर त्यांच्या विरोधात वक्तव्य केली आहेत. यात राजेश काळेना खंडणीखोर, गुन्हेगारी प्रवृत्ती अनेक गुन्हे दाखल असलेला अशी बिरुद जोडली आहेत. आज सुरेश पाटलांच्या या वक्तव्यांना राजेश काळे यांनी तितक्याच जोरात प्रतिउत्तर दिलं आहे.
त्यांनीही सुरेश पाटील यांना तोडीबाज, दबावतंत्राचा बापर करणारा, पक्षविरोधी भूमिका घेणारा हा जेष्ठ नगरसेवक असून प्रशासनाला वारंवार ब्लॅकमेल करतो, अशी टिका केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आपल्या दोघांच्या वादात भारतीय जनता पार्टीची प्रतिमा मलिन होत नाही का? यावर राजेश काळे म्हणाले, मी अन्याय का सहन करू पक्षप्रमुखांना सुरेश पाटील आणि आपल्यातील फरक माहित आहे. मी गुन्हा दाखल झाला, पक्षानं कारवाई केली, डगमगलो नाही. चुका करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहीजे. सुरेश पाटलांना एक न्याय आणि माझ्यावर अन्याय हे मी कसं सहन करु, असं प्रतिसवाल केला.
आपण कामचुकार अधिकाऱ्यास दरडावले तेव्हा आपल्या विरुध्द आयुक्तांनी घाईघाईनं गुन्हा दाखल केला. पण हीच घाई ते सुरेश पाटलांच्या बाबत का घेत नाहीत, असा सवालही राजेश काळेंनी आयुक्तांना केला आहे.
जनतेच्या कामासाठी शिविगाळ केली होती. मी खंडणीखोर अथवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही. पण माझ्यावर आरोप करणारे काय आहेत हे त्यांनी तपासावे. माझे काही मटका धंदे नाहीत, असाही टोला काळे यांनी यावेळी लगावला.
* राजेश काळे यांचा बोलविता धनी कोण?
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले खंडणी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे उपमहापौर राजेश काळे यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये. काळे यांचा बोलविता धनी कोण असे, म्हणत नगरसेवक पाटील यांनी काळेवर पलटवार केला आहे.
काळेंवर गुन्हाही दाखल आहे. अर्वाच्च शिविगाळ केल्यामुळे काळेंवर गुन्हा दाखल आहे. आपण असे गुन्हा दाखल होण्यासारखे काहीही केलेले नाही. गुन्हा दाखल करावयाचा अधिकार महापौरांना आहे. महापालिकेच्या उपायुक्तांना नाही.