कानपूर : भारताच्या हाती आलेली टेस्ट अखेर ड्रॉ झाली आहे. 284 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 9 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली. एकवेळ भारत या सामन्यात जिंकेल, असे वाटत असताना भारताला अखेरची विकेट्स घेण्यात अपयश आले आणि सामना ड्रॉ झाला.
भारताने पहिल्या डावात 345 धावा केल्या होत्या. तर 234 धावांवर दुसरा डाव घोषित केला होता. तर न्यूझीलंडने पहिल्या डावात 296 धावा केल्या होत्या. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना नाट्यमयरीत्या अनिर्णित अवस्थेत संपला. कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला विजयाची सर्वाधिक संधी असताना, न्यूझीलंडच्या अखेरच्या जोडीने कमालीचा संयम दाखवत सामना अनिर्णित राखला.
सामन्याच्या अखेरच्या दिवशी 1 बाद 4 या धावसंख्येवरून पुढे खेळताना न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथम व चौथ्या दिवशीचा नाईट वॉचमन विल समरविल यांनी संपूर्ण पहिले सत्र भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. मात्र, दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी तीन बळी मिळवत पुनरागमन केले. अखेरच्या सत्रात भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी सहा गडी बाद करणे आवश्यक होते. भारतीय गोलंदाजांनी अखेरपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, ते न्यूझीलंडचा अखेरचा गडी बाद करू शकले नाहीत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
न्यूझीलंडचा नववा गडी टीम साऊदीच्या रूपाने बाद झाला. यानंतरही जवळपास 9 षटकांचा खेळ होणे शिल्लक होते. या सामन्यात पदार्पण करणारा अष्टपैलू रचिन रवींद्र हा मैदानावर उभा होता. अखेरचा फलंदाज म्हणून फिरकीपटू एजाज पटेल मैदानावर उतरला. भारताचे तीनही फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा व अक्षर पटेल यांनी अखेरचा गडी बाद करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, रचिन आणि एजाज यांनी त्यांना यश मिळू दिले नाही. तब्बल 52 चेंडूची अभेद्य भागीदारी करत त्यांनी सामना अनिर्णित राखला.
न्यूझीलंडची अखेरची जोडी मैदानात असताना सर्व चाहत्यांचे लक्ष पंच नितीन मेनन आणि वीरेंद्र शर्मा यांच्याकडे होते. कारण, अखेरच्या जवळपास अर्ध्या तासात मैदानावरील प्रकाश कमी झाला होता. त्यामुळे दोन्ही पंच वारंवार लाईट मीटर बाहेर काढत पुरेसा प्रकाश उपलब्ध आहे की नाही हे पाहत होते.
मात्र, अखेरीस याच प्रकाशाने भारतीय संघाचा खेळ केला. खराब प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबवला व न्यूझीलंड संघ सामना अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरला. मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.