सोलापूर : कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या 160 पैकी 46 उमेदवारांचे अर्ज छाननीत नामंजूर करण्यात आले आहेत. पोटनियमातील तरतुदीनुसार गेल्या तीन वर्षात एकदाही कारखान्याला ऊस घातला नसल्याने व अन्य कारणांचा ठपका अर्ज नामंजूर करण्यामागे ठेवण्यात आला आहे.
दरम्यान निवडणुकीसाठी पात्र असलेल्या 114 उमेदवारांची यादी सोमवार, 6 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रसिध्द केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिली.
श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या संचालकांच्या 20 जागांसाठी 25 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. यासाठी 160 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या दाखल उमेदवारी अर्जांची छाननी कारखाना परिसरातील कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनात आज शुक्रवारी करण्यात आली.
छाननीदरम्यान उमेदवारांनी अन्य उमेदवारांच्या अर्जाला तोंडी वगळता लेखी स्वरुपात कसलीही हरकत नोंदविली नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी तोंडी हरकतीची दखल घेतली नाही. परंतु प्रशासनाने त्यांच्या छाननीत गेल्या तीन वर्षात कारखान्याला एकदाही ऊस न घातलेल्या उमेदवारांचे अर्ज नामंजूर केले आहेत.
ऊस उत्पादक सभासद मतदारसंघातून 135 पैकी 37 उमेदवारांचे अर्ज नामंजूर केले आहेत. तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून 9 पैकी 3, महिला राखीव प्रवर्गातून 12 पैकी 6 अर्ज अवैध ठरविले आहेत. संस्था सभासद मतदारसंघातून दाखल चारही अर्ज मंजूर झाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संस्था सभासद मतदारसंघ वगळता उर्वरित तिन्ही मतदारसंघातून एकूण 46 उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे 114 जणांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, 10 डिसेंबर रोजीच्या दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार असल्याने अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयात काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे, दक्षिणचे माजी सभापती भीमाशंकर जमादार, दक्षिणचे काँग्रेस तालुकाध्यक्ष हरीश पाटील ही नेतेमंडळी गुरुवारी दिवसभर ठाण मांडून होती.
धर्मराज काडादी, रामप्पा चिवडशेट्टी, राजशेखर बिराजदार पाटील, सुरेश हसापुरे, महादेव जोकारे, सिद्रामप्पा अब्दुलपुरकर, अशोक देवकते, सिद्धाराम चाकोते, हरीश पाटील, बसवराज पाटील, आप्पासाहेब पाटील, गुरुसिद्ध म्हेत्रे, रमेश हसापुरे, सर्जेराव शेळके, भारत जाधव, हणमंत बिराजदार या प्रमुखांनी अर्ज भरला. तर सुधीर थोबडे, काशीनाथ कोळी, बसवराज देशमुख, सिद्रामप्पा कराळे, प्रकाश वानकर, सुवर्णा पाटील या विद्यमान संचालकांनी अर्ज दाखल केले नाहीत. इच्छुक उमेदवारांना 6 ते 20 डिसेंबर या कालावधीत दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणूक लागल्यास 25 डिसेंबर रोजी मतदान 26 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे.