अक्कलकोट : ओमीक्रोन व्हेरियंटचे रुग्ण कर्नाटकात आढळल्याने सोलापूर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. सोलापूर विजयपूर महामार्गावरील टाकळी येथे आंतरराज्य सीमेवर कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांची आजपासून तपासणी सुरू करण्यात आली आहे. आरटीपीसीआर टेस्ट व दोन लसीकरण झालेल्या प्रवाशांनाच सोडले जात आहे.
मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. नितीन थेटे, नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, आरोग्य विभागाचे कर्मचारी आज सकाळीच टाकळी येथील तपासणी नाक्यावर आले. त्यांनी कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी सुरू केली.
संपूर्ण देशात चर्चेचा विषय असलेल्या कोरोना ओमीक्रोन व्हेरियंटचे गुरुवारी दोन रुग्ण कर्नाटकात आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली. त्यामुळे सोलापूर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर जिल्ह्यात कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट आणि लसीकरण बंधनकारक करण्यात आल्याची माहिती काल सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली होती. त्यांनी कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रमुख महामार्गावर तपासणी नाके सुरू करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार आजपासून टाकळीत येथे तपासणी सुरू करण्यात आली. मंद्रुप पोलीस ठाण्याचे अधिकारी व पाच ते सहा कर्मचारी या तपासणी नाक्यावर आहेत. दिवस-रात्र येथे कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांना त्यांची तपासणी करूनच महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश दिला जात आहे. ज्यांनी लसीकरण केले नाही किंवा टेस्ट रिपोर्ट नाही त्यांना परत पाठविले जात आहे. सध्या राज्यातील एसटीचा संप सुरू असल्याने कर्नाटकातील अनेक बसेस टाकळी येथूनच परत जात आहेत.
“ओमीक्रोन व्हेरियंटचे रुग्ण कर्नाटकात आढळल्याने प्रशासनाने या राज्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार आजपासून महसूल पोलीस व आरोग्य विभागाच्या वतीने टाकळी येथे तपासणी सुरू केली. लस घेतलेले व टेस्ट रिपोर्ट असलेल्यांनाच तपासून सोडले जात आहे.”
डॉ. नितीन थेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक