नाशिक : नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती समोर आली आहे. साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी पुण्याहून आलेले दोन प्रकाशक करोनाबाधित आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. आता त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी पालिकेची धावपळ सुरू झाली आहे.
साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराजवळ रॅपिड अॅंटिजन टेस्टमध्ये पुणे येथून आलेल्या दोन प्रकाशकांची करोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. पुणे येथील दोघांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. आरोग्य यंत्रणेने संबंधितांना स्थानिक महापालिका रुग्णालयात उपचार घेण्याचा किंवा स्वतःच्या वाहनाने स्वगृही परतण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला होता.
दोघे पुन्हा पुण्याकडे रवाना झाले असून सध्या ते संगमनेरपर्यंत पोहोचले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आडगाव येथील भुजबल नॉलेज सिटी येथे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे संमेलनाचा आज तिसऱ्या दिवशी समारोप होत आहे. अशात दुपारी साडेबारा ते एक च्या दरम्यान पुणे येथून दोघे कलाप्रेमी संमेलनात सहभागी होण्यासाठी दाखल झाले होते. आरोग्य यंत्रणेला संशय आल्याने या दोघांची रॅपिड अँटिजेंन टेस्ट करण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्य यंत्रणेने नाशिक येथील बिटको हॉस्पिटल येथे दाखल होत उपचार घेण्याचा पर्याय संबंधितांना दिला. परंतु त्यांनी स्वगृही परतण्याचा पर्याय निवडला. आढळून आलेले दोन्ही पॉझिटिव्ह पुरुष असून पिंप्री चिंचवड येथील 42 वर्षीय तर आळंदी येथील बावीस वर्षीय रुग्णाचा यात समावेश आहे.
विशेष म्हणजे या दोन्ही रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले होते. यापैकी एकाचे एक डोस तर दुसऱ्याचे दोन्ही डोस झालेले होते. दोघांमध्ये कुठलीही लक्षणे आढळून आलेली नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोग्य यंत्रणा संबंधितांच्या संपर्कात असल्याचेही सांगण्यात आले.
भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात तीन दिवासांपासून सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची आज सांगता होणार आहे. परंतु, अखेरच्या दिवशी दोघे पाॅझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मागच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचे रूग्ण सापडल्यानंतर जगभरात चिंता वाढली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने सर्वच देशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारतातही ओमायक्रॉनचे आतापर्यंत 6 रूग्ण सापडले आहेत. त्यातील एक रूग्ण महाराष्ट्रातील आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे देशासह राज्यातही कडक निर्बंध घालण्यात आले आलेत, असे असताना संमेलनस्थळी अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.