सोलापूर : नूतन पोलीस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. उपमहापौर राजेश काळे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक यांच्या मुलावर तडीपारीची कारवाई केली आहे. दोन्ही कारवाई राजकीय क्षेत्रातील असल्याने स्थानिक राजकारण तापलं आहे. आयुक्त हरिश बैजल यांनी काळे यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
नगरसेवक राजेश काळे यांना सोलापूर व उस्मानाबाद जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका येथून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. तसेच नगरसेवक पुत्र चेतन नागेश गायकवाड यांच्यावरही तडीपारीची कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त कडूकर यांच्याकडून सांगण्यात आले.
महापालिकेतील उपमहापौर शहरामध्ये आपला उद्देश साध्य करण्याच्या हेतुने राजकीय पदाचा गैरवापर करून नियमबाह्य पध्दतीने काम करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करणे, सामान्य नागरिक व व्यावसायिकांना धमकावून पैशांची मागणी करणे, शासकीय अधिकारी व सामान्य नागरिकांना ॲट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देणे, शासकीय कर्मचारी काम करीत असताना धाकदपटशा करून सरकारी काम करू नये याकरीता अंगावर जाणे इत्यादी गंभीर गुन्हे करणाऱ्या राजेश दिलीप काळे (वय ४१, रा. गॅलक्सी अपार्टमेंट विरशैवनगर, जुळे सोलापूर) यावर तडीपाराची कारवाई करण्यात आल्याचे पोलिस प्रसिध्दीपत्रकात नमूद आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राजेश काळे यांच्यावर सोलापूरात विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये तीन, सदरबझारमध्ये १ तर सांगवी आणि निगडी, पुणे येथे प्रत्येकी एक असे एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. यात नजीकच्या नागरिकांना, व्यवसायिकांना ईजा पोहचविणे, धमकावणे, कार्यालयात घुसून हल्ला सरकारी कामात अडथळा आणणे असे शरीर आणि मालाविषयक गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक भाजप राजकारणात ते आमदार सुभाष देशमुख गटाचे समजले जातात, ते सध्या महापालिकेत नियमित कामकाजात भाग घेत होते. पोलीसांनी आज पहाटे पाचच्या सुमारास जुळे सोलापूर गॅलेक्सी अपार्टमेंट येथे जावून त्यांना ताब्यात घेतलं आणि रवानगी पुण्याच्या दिशेनं केली आहे.
पोलिसांच्या दुसऱ्या कारवाईत चेतन नागेश गायकवाड (वय २०, राहणार सेंटलमेंट कॉलनी क्रमांक ३ विठ्ठल मंदिराजवळ ) यास सोलापूर व उस्मानाबाद जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका येथून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून दमदाटी करणे, वेळप्रसंगी जीवे मारणे, साथीदारांसह दहशत निर्माण करणे आदी गुन्हे केल्याप्रकरणी कारवाई झाल्याचे पत्रकात नमूद आहे.
* विभागीय आयुक्त, न्यायालयात दाद मागणार
उपमहापौर राजेश काळे या तडीपारच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. काळे म्हणाले, आपल्या विरोधात आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षातील विरोधकांनी एकत्र येवून केलेलं हे कुभांड असून पोलीस प्रशासनानं या दबावामुळे राजकीय त्वेषातून ही कारवाई केली आहे. आपण या विरोधात विभागीय आयुक्त आणि न्यायालयात दाद मागणार आहोत. आपल्यावर चोरी, दरोडे खून, वाळू माफिया असे कोणतेही आरोप नाहीत. जनतेच्या कामासाठी कामचुकार अधिकाऱ्यांना जाब विचारणं गैर आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.