सोलापूर : दहिटणे (ता.अक्कलकोट) येथे वेगाने जाणारी बैलगाडी उलटल्याने अप्पाराव विश्वंभर भोसले (वय ५८) हे जखमी झाले. ही घटना आज शनिवारी दुपारच्या सुमारास दहिटणे येथे घडली.
अप्पाराव भोसले हे आपल्या शेतातील उसाचा वाडा बैलगाडीत भरून घराकडे निघाले होते. घराच्या काही अंतरावर बैलगाडी उलटल्याने ते जखमी झाले. त्यांना अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
* वैरागवाडी येथे कोयता, लोखंडी गज आणि खोऱ्याने हल्ला; महिलेसह चौघे जखमी; ७ जणांवर खुनी हल्याचा गुन्हा
सोलापूर – वैरागवाडी (ता. मोहोळ) येथे भावकीतील शेत जमिनीच्या वादातून कोयता, लोखंडी गज, काठी आणि खोऱ्याने केलेल्या मारहाणीत एका महिलेसह चौघे जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणात मोहोळच्या पोलिसांनी ७ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
जखमीमध्ये प्रकाश जालिंदर बाबर (वय ६०) प्रमिला सुरेश बाबर, अशोक सुरेश बाबर आणि संजय प्रकाश बाबर ( सर्व रा. बैरागवाडी) यांचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी अनिल पोपट बाबर, नितीन बाबर, सतीश बाबर, राजाराम बाबर, ज्ञानेश्वर बाबर, विलास बाबर आणि सुनील बाबर अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
गुरुवारी दुपारच्या सुमारास जखमी प्रकाश बाबर हे आपल्या नातेवाईकांसोबत शेतात बोरे वेचत होते. त्यावेळी अनिल बाबर याने आमच्या शेतातून बैलगाडी नेऊ नका,पिकाचे नुकसान होते. असे म्हणत सर्वांना बोलावून घेतले. आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. अशी नोंद पोलिसात झाली . फौजदार राठोड पुढील तपास करीत आहेत.
* पंढरपूर येथे शिक्षकाचे घर फोडले रोख रकमेसह लाखाचे दागिने लंपास
सोलापूर – कॉलेजच्या पाठीमागील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या अनिल मारुती जगताप या शिक्षकाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील २५ ग्राम सोन्याचे दागिने, ७ हजाराची रोकड, चांदीचे साहित्य आणि अंगणात ठेवलेली मोटर सायकल असा एकूण १ लाख ८ हजाराचा ऐवज पळविला. ही चोरी काल शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद पंढरपूर शहर पोलिसात झाली. हवालदार ढेरे पुढील तपास करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* मुस्तीत मुख्याध्यापकांकडून मारहाण
सोलापूर : मुस्ती (ता.दक्षिण सोलापूर) येथे पगार स्लिपवर सही करा असे सांगितल्याच्या कारणावरून काठी आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत विशाल प्रताप पाटील (वय ३८ रा. शेळगी) हे जखमी झाले. ही घटना आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात विवेक पाटील (भाऊ) यांनी दाखल केले. त्यांना मुख्याध्यापक अविनाश पाटील आणि गणेश पाटील यांनी मारहाण केली. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
* शिंगडगाव येथे काठी दगडाने मारहाण दोघे जखमी
शिंगडगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथे काठी दगड आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत चंद्रकांत शिवराम पाटील (वय ६४) हे जखमी झाले. त्यांना अमोल पाटील याने मागील ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून मारहाण केली. असे त्यांचे म्हणणे आहे. तर दुसर्या घटनेत अमोल रामकृष्ण पाटील (वय३०) हा जखमी झाला.
त्याला चंद्रकांत पाटील आणि अन्य दोघांनी मारहाण केली. माझ्याकडे कामाला काय येत नाही. म्हणून चंद्रकांत पाटील यांच्यासह दोघांनी मारहाण केली असे त्याचे म्हणणे आहे. दोघांनाही वळसंग येथे प्राथमिक उपचार करून गुरुवारी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले .