सोलापूर : आर्थिक व्यवहारात थकित असलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून सोलापुरातील सत्यनारायण मदनलाल करवा या व्यापाऱ्याने हैद्राबाद येथील हनुमान घनशाम शर्मा या व्यापाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून खून केला. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी सत्यनारायण करवा व त्याचा मुलगा मनोज करवा (दोघे रा. वर्धमान नगर, रुपाभवानी रोड, सोलापूर) यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच मयताच्या प्रत्येक वारसास एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिला.
या घटनेची हकीकत अशी की, २१ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मयत हनुमान घनशाम शर्मा (रा. महाराज गंज, हैदराबाद) हे त्यांचे एमसीएक्स व्यवहारातील १५ लाख रुपये मागण्याकरिता आरोपी सत्यनारायण करवा याच्या घरी गेले होते. त्यावेळी आरोपी सत्यनारायण करवा यांनी मी तुला ओळखत नाही. तू माझ्या घरात आलाच कसा ? माझा काही संबंध नाही. तू येथून गेला नाहीस तर माझा मुलगा पोलीस मेंबर आहे. त्याला सांगून तुझ्यावर केस करायला लावीन, असे धमकावले.
त्यावर मयताने काहीतरी पैसे द्या, नाहीतर मला मरावे लागेल, असे म्हणून सोबत नेलेली पेट्रोलची बाटली बाहेर काढली. स्वतःच्या अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न करु लागला. त्यावेळी मयत हनुमान याने एका हातात लायटर दाखवला तेवढ्यात आरोपी व आरोपीचा मुलगा समोर आले. आरोपी सत्यनारायण करवा याने हनुमान याला तू काय मरतो? आम्ही तुला दाखवतो; कसे मरायचे ते. असे म्हणून दोन्ही आरोपींनी मयताच्या हातातील पेट्रोलची बाटली घेऊन मयताचा अंगावर ओतली. व झोंबाझोंबी करत मयताच्या हातातील लायटर घेऊन मयतास पेटवून दिले.
यावेळी मयत हनुमंत शर्मा ओरडत असताना त्याला विझवण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, उपचाराकरिता त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचाराकरिता त्यास पुणे व त्यानंतर हैद्राबाद येथे दाखल केले असता ३१ जानेवारी २०१७ रोजी उपचारादरम्यान हनुमान शर्मा हे मयत झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यातील आरोपींनी मयताच्या अंगावर पेट्रोल ओतून खून केला. तसेच आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचा लॅपटॉप व मोबाईल यांची विल्हेवाट लावली. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात फिर्याद देण्यात आली. न्यायालयात दोषारोप पाठवण्यात आले.
सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी ७ साक्षीदार तपासले. वैद्यकीय पुरावे, परिस्थितीजन्य पुरावा व मयताचे तीन मृत्यूपूर्व जबाब. या सर्व गोष्टीवरून सदर आरोपींनी त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून खून केल्याचे निष्पन्न झाले.
जिल्हा सरकारी वकील रजपूत यांनी केलेला हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सत्यनारायण करवा व त्याचा मुलगा मनोज करवा या दोघांना खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवले. या प्रकरणात मयताच्या प्रत्येक वारसास नुकसान भरपाई म्हणून आरोपीकडून प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचा आदेश पारित करण्यात आला.
सदर मयतास पत्नी रुपा हनुमान शर्मा, मुलगा अभिषेक व मुलगी सुष्मिता अशी तीन कायदेशीर वारस असल्याने एकूण ३ लाख रुपये इतकी नुकसान भरपाई आरोपींनी सदर मयताच्या वारसास द्यावी लागणार आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एच. पाटील यांनी केला. या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल रफिक तांबोळी, अनुराधा गुत्तीकोंडा यांनी काम पाहिले.