मोहोळ : १४ वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीबरोबर दीड वर्षापूर्वी झालेला बालविवाह रोखून संबंधित नातेवाईकांवर गुन्हा दाखल करून समज देऊन सोडून दिल्यानंतर पुन्हा त्याच मुलीबरोबर गुपचूप बालविवाह करून ती मुलगी सात महिन्यांची गरोदर राहील्याची घटना उघडकीस आलीय.
घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा बाल विकास कार्यालयामार्फत चौकशी करून संबंधित पतीसह अन्य तिघांवर मोहोळ पोलिस ठाण्यात बाल लैंगिक संरक्षण कायदा अधिनियमानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ही खळबळजनक घटना मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील नजीक पिंपरी येथे १५ जून २०२० रोजी नजिक पिंपरी येथील सागर महादेव मेटकरी या मुलाचा विवाह एका १४ वर्षाच्या मुलीबरोबर होत असल्याची तक्रार जिल्हा बाल विकास अधिकारी अतुल वाघमारे यांना मिळाली होती. त्यानुसार १५ जून २०२० रोजी नजीक पिंपरी येथे जिल्हा बाल विकास अधिकारी यांच्या पथकाने भेट देत तो बालविवाह रोखला होता.
त्या दिवशी संबंधित सागर महादेव मेटकरी व त्याच्या नातेवाईकांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांचे समुपदेशन करून त्यांना सोडून दिले होते. दरम्यान पुन्हा सागर महादेव मेटकरी याचा विवाह त्याच मुलीशी गुपचूप लग्न लावून देण्यात आला आला. दरम्यान ती पीडित मुलगी सात महिन्यांची गरोदर असल्याची निनावी तक्रार जिल्हा बाल विकास अधिकारी कार्यालयास प्राप्त झाली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर अतुल वाघमारे यांच्या पथकाने नजीक पिंपरी येथे भेट देऊन त्या मुलीचा पुन्हा विवाह झाला असून ती मुलगी गरोदर झाल्याचे निदर्शनास आले. ज्या दवाखान्यामध्ये तिने उपचार घेतले तेथील सोनोग्राफी केलेले सर्व रिपोर्ट जमा केले.
यावरून मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये सागर मेटकरी, त्याची आई संगीता मेटकरी, पीडित मुलीचे वाडील नामदेव वाघमोडे व मुलीची आई श्रीदेवी वाघमोडे या चौघा जणांचा विरोधात बाललैंगिक संरक्षण कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने हे करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध